Dehugaon: दोन सामाजिक संस्थांना राज्यस्तरीय ‘नेल्डा’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – समाजासाठी निस्वार्थपणे अथक परिश्रम घेणार्‍या देहूतील आरोग्यक्रांती प्रतिष्ठान आणि अप्पा पटवर्धन सफाई व पर्यावरण तंत्रनिकेतन या दोन संस्थांना राज्यस्तरीय ‘नेल्डा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

पुणे कॅम्प येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव, नेल्डा फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक वेदार्थ देशपांडे, देशपी व्यवसाय समूहाचे श्रीराम देशपांडे उपस्थित होते. आरोग्यक्रांती प्रतिष्ठानला आरोग्य विभागातील राज्यस्तरीय ‘नेल्डा पुरस्कार’ तर अप्पा पटवर्धन संस्थेला पर्यावरण विभागात गौरविण्यात आले.

आरोग्यक्रांतीकडून उपाध्यक्ष महेश काळोखे व संचालिका डॉ. हिना मुलाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी आरोग्यक्रांतीचे संस्थापक डॉ. अहेफाज मुलाणी यांनी अल्पावधीत संस्थेला मिळालेल्या यशाचे श्रेय देहूच्या सर्व ग्रामस्थांना दिले. लोकांनी संस्थेच्या कार्यक्रमाला आजवर दिलेला प्रतिसाद पुरस्कार मिळण्यासाठी कारणीभूत ठरल्याने देहूकरांचे आभार मानले. आरोग्यक्रांतीला मिळालेला हा पुरस्कार त्यांनी गुरुवर्य कै. पद्मश्री डॉ. सुहास मापुसकरांच्या पवित्र स्मृतींना अर्पण केला. एकाच वेळी गुरू आणि शिष्याच्या संस्थेला मिळालेला पुरस्कार हा देहूकरांचा सन्मान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

तसेच कै. डॉ मापुसकरांनी दिलेल्या सार्वजनिक आरोग्याच्या शिकवणीवरच इथून पुढेही भविष्यात काम करण्याचा संकल्प त्यांनी केला. समाजासाठी निस्वार्थपणे अथक परिश्रम घेणार्‍या महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांचा गौरव नेल्डा पुरस्काराने दरवर्षी करण्यात येत असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून विभागानुसार आलेल्या 133 संस्थांपैकी 11 श्रेणीत एकूण 19 संस्थांचा नेल्डा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.