Lonavala : 24 तासात 335 मिमी पावसाची नोंद

एमपीसी न्यूज- घाट माथ्यावरील पावसाचे माहेरघर असलेल्या लोणावळा शहरात मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्या 24 तासात तब्बल 335 मिमी (13.19 इंच) एवढा पाऊस झाला आहे. पहिल्याच धुव्वाधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. कोरडे पडलेले नदी नाले व धबधबे धो धो वाहु लागले आहेत.

लोणावळा शहरात रस्त्यांच्या कडेला असलेली गटारे ही माती व राडारोडा यामुळे बंद झाल्याने बाजारभागासह रायवुड, नांगरगाव, भांगरवाडी, तुंगार्ली व पांगोळीकडे जाणारा रस्ता, द्रुतगतीच्या पुलाखालील भाग हा जलमय झाला होता. पहिल्याच पावसात या भागातून वाहने नेणे तसेच पायी चालणे जिकिरीचे झाले होते. पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असला तरी रिमझिम सुरुच आहे.

लोणावळा शहरातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी वाहून जाण्यास काहीसा अडथळा निर्माण होत आहे. भांगरवाडी भागात झाड पडण्याची घटना वगळता शहरात पावसामुळे कसलेही नुकसान झालेले नसले तरी पहिल्याच पावसात शहरात मात्र सर्वत्र पाणी तुंबल्याचे चित्र पहायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.