Pimpri : नवीन गाड्यांसह आजपासून कचरा संकलन अन्‌ वहन; ओला, सुका कचरा वेगळा करुन देण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम नवीन कंत्राटदाराने आज (सोमवार)पासून सुरु केले आहे. नवीन गाड्यांसह कचरा संकलन आणि वहनाच्या कामास सुरुवात केली आहे. नागरिकांनी ओला, सुका आणि घातक कचरा वेगळा करुन देण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करुन कचरा संकलनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

शहरातील कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना 21 कोटी 56 लाख आणि दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स 22 कोटी 12 लाख रुपयांमध्ये देण्यात आले आहे. 28 फेब्रुवारी रोजी महापालिकेने दोन्ही कंत्राटदारांना कामाची वर्कऑर्डर दिली होती. तथापि, वाहने उपलब्ध झाली नसल्याने काम सुरु केले नव्हते. वाहने उपलब्ध झाल्यानंतर आजपासून संपूर्ण नवीन वाहनांसह शहरातील कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु झाले आहे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”नागरिकांनी ओला, सुका आणि घातक कचरा वेगवेगळा करुन द्यावा. कचरा वेगळा करुन देण्याबाबत महापालिकेतर्फे जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर एकत्रित कचरा स्वीकारला जाणार नाही. ओला आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. नवीन कचरा संकलन आणि वहनाचे योग्य ते नियोजन केले आहे.

निश्चित करण्यात आलेल्या रूट मॅप प्रमाणे कामकाज केले जाईल. कचरा गाडीमध्ये कर्मचारी उभा राहणार नाही. हॉटेल व्यावसायिकांकडून कचरा विलगीकरण न केल्यास त्यांच्यावर दंडात्मत कारवाई केली जाईल. कचराकुंडी ‘ओव्हरफ्लो’ होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. प्रत्येक आठवड्याला कचराकुंड्या धुवून साफ केल्या जाणार आहेत. रस्त्यावरील सर्व कचरा उचलून तो गोळा करण्याबाबत आरोग्य निरीक्षकांना सूचना देण्यात आल्याचे डॉ. रॉय यांनी सांगितले.

ओला कचरा: घरातील कचरा, भाजी व फळांची साले, उरलेले अन्न, अंड्याची टरफले, कुजलेली फळे व भाज्या, चहा व कॉफीची पूड, मांसाहारी खाद्यपदार्थ, शहाळे, नारळ्याचा शेंड्या, हार, फुले, निर्माल्य, पालापाचोळा, डहाळी, सुकलेली पाने, गवत, खराब टिशू पेपर, केस.

सुका कचरा: प्लास्टिक पिशव्या व वस्तू, बाटल्या, डबे, कप, दुधाची पिशवी, चॉकलेट, टॉफी व चिप्सचे आवरण, वर्तमानपत्रे, मासिके, स्टेशनरी, कागदी बॉक्स, टेट्रापॅक, कागदी कप, प्लेट, धातू, धातूचे बॉक्स, धातूचे कंटेनर, डबे, काचेच्या बाटल्या, रबर, थर्माकोल, जुन्या चिंध्या, फडके, स्पंज, सौंदर्यप्रसाधने, लाकूड व चिनी मातीच्या वस्तू.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.