Chakan : खेडमधील दोन गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार

एमपीसी न्यूज- चाकणच्या औद्योगिक पट्ट्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडून सुरु आहेत. चाकणसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अनेक गुंडांच्या तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या खेड तालुक्यातील नाणेकरवाडी आणि आंबेठाण येथील दोघांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर ( वय 25, रा, नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) व संतोष ज्ञानेश्वर मांडेकर ( वय 40, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांवरही शारीरिक व मालमत्तेशी संबंधित अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या आदेशान्वये वरील दोघांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. नाणेकर याला दोन वर्षांसाठी तर मांडेकर याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

आणखी कारवायांची शक्यता

चाकण शहरातील आणि जवळच्या ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. एमपीडीए कायद्यानुसार चाकणमधील अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. चाकण परिसरातून आणखी काही गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव आहेत. त्याचप्रमाणे संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या काहींना विविध कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांनी बाह्या सरसावल्याने गुन्हेगारी क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.