Pimpri : शहरात भरली विठु नामाची शाळा

विविध शाळांमध्ये उत्साहात रंगला पालखी सोहळा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आषाढी एकादशीनिमित्त शहरात असणा-या विविध शाळांमध्ये दिंडी काढण्यात आली. या वेळी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, झेंडेकरी, वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’चा नामघोष केला.

रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे यांच्या हस्ते दिंडी व ग्रंथ पूजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी वारक-यांचा वेष परिधान करून ‘ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोष व हरिनामाचा जयजयकार करीत दिंडीत मोठ्या उत्साहाने विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पोपट नखाते, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्रीविद्या रमेश, सचिन कळसाईत यांच्यासह राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातिल अनेक मान्यवर तसेच पालक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देत झाडे लावा, झाडे जगवा अशा घोषणा देत होते.’स्त्री भृणहत्या’,’पाणी वाचवा पाणी जिरवा’हा संदेश दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. ही दिंडी शाळेपासून शिवार चौकातून परत शाळेत मुक्कामी आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
झेप संस्थेच्या विशेष मुलांनी रस्टन कॉलनी येथील दत्त मंदिरात आज गुरुवारी वारकरी वेशभूषा परिधान करून, भजन व फुगडीचा आनंद घेतला.

चिंचवडगावातील रस्टन कॉलनी, पवनानगर परिसरातील दत्त मंदिर येथे ‘झेप’ या संस्थेची विशेष मुलं वारकरी वेशभूषा परिधान करून आली होती. या सर्व मुलांचे रस्टन कॉलनी मित्रमंडळ तसेच दत्त मंदिर व्यवस्थापन यांच्या तर्फे स्वागत करण्यात आले. तसेच, मुलांनी मंदिरात भजन व फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला. त्यानंतर मुलांना रस्टन कॉलनी मित्र मंडळ व दत्त मंदिर व्यवस्थापन यांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमास क्षीरसागर काका तसेच शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर, अश्विन मायनाळे, संतोष मेदने, गणेश परदेशी, संतोष मोरजकर आदी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोरे वस्ती येथील ज्ञानदा प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढून पर्यावरणाची जनजागृती करण्यात आली. संस्था सचिव लहू कांबळे यांच्या हस्ते तुकाराम महाराज व विठ्ठल रुखमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडीस प्रारंभ झाला.

यावेळी अध्यक्ष गोकुळ गायकवाड, उपाध्यक्ष अंकुश कांबळे, ज्योती कांबळे, नंदा कांबळे, मुख्याध्यापिका निता करपे आदी उपस्थित होते. मोनिका सुतार यांनी वारीचे महत्त्व विषद केले. शिवरकर चौक, मोरे वस्ती, ताम्हाणे वस्ती या परिसरातून दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, निसर्ग हाच गुरू, ग्रंथ हेच गुरु, झाडे लावा झाडे जगवा,सुका कचरा, ओला कचरा वेगळा करा, बेटी बचावो-बेटी पढाओ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.

सूत्रसंचालन शीतल शिंदे यांनी तर आभार दीपक जरे यांनी मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली.

शमीम हुसेन फाउंडेशन संचलित मारुंजी येथील वेलकम स्कूल या प्री. प्रायमरी शाळेत आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांची वारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमावेळी शाळेमधील तीन ते पाच या वयोगटातील मुलामुलींनी या वारीमध्ये सहभाग घेऊन विठ्ठल नामाची शाळा भरली. या भक्ती गीतावर ताल धरून भक्तीमय वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाचे आयोजनात शाळेच्या शिक्षिका नीता, पूनम, नाहिद, आश्विनी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळेच्या संचालिका शबनम सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

चिंचवड येथील शिशुविहार विद्यालयात विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला अशा भजनाच्या ओळींनी व ग्यानबा-तुकारामया जयघोषाने आकुर्डीचा परिसर दुमदुमुन गेला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय आकुर्डी या विद्यालयात पालखी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शिशुवर्गापासून इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. कप काही विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. यावेळी संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिता काळे, शाळेचे शिक्षक आदी उपस्थित होते. वारकरी चिमुकल्यांनी आकुर्डी गावातील विठ्ठल मंदिरात गेले. यावेळी मंदिरात या चिमुकल्या वारक-यांनी आपल्या गोड आवाजात भजने सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली मोहिते यांनी केली. आषाढी एकादशी माहिती सुलभा दरेकर यांनी सांगितले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुरेखा नलावडे, माधवी भोसले, गौरी वाडकर, मंजुषा बावधनकर, बालिका कुलकर्णी, सीमा सोनवणे, कविता रोडे, निलिमा धनवडे, नंदकिशोर गायकवाड, विकास कदम, प्रकाश कडू, ज्योती देशमुख, वर्षा नलावडे, दिपाली सोनवणे आदी शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.