Pune : स्केटआर्ट’ द्वारे कलात्मक स्केटिंग प्रकारांचे शनिवारी सादरीकरण

एमपीसी न्यूज- पुण्यातील प्रख्यात स्केटिंग प्रशिक्षक मेघना जुवेकर यांच्यातर्फे ‘स्केटआर्ट’ या अनोख्या आणि कलात्मक स्केटिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या शनिवारी (दि. 20) एरंडवणे येथील डॉ. शामराव कलमाडी शाळेमधील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

याबाबतची माहिती जुवेकर आणि त्यांच्या शिष्या कंंचन मुसमाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मेघना जुवेकर या स्वतः स्केटिंग या क्रीडा प्रकारासाठी आंतरराष्ट्रीय परीक्षक म्हणून काम पाहतात तसेच त्या राष्ट्रीय स्केटिंग तंत्रज्ञ समितीच्या सभासद आहेत. त्यांच्या शिष्या शिवछत्रपती पुरस्कार विजेती कंंचन मुसमाडे या स्वतः राष्ट्रीय स्तरावरील उत्तम स्केटिंग खेळाडू असून ओडिसी नृत्यात पारंगत आहेत.

आर्टिस्टिक रोलर स्केटिंग हा क्रीडा प्रकार सर्वसामान्य लोकांना माहीत व्हावा व अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून प्रेरणा मिळून नवीन खेळाडू घडावेत या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे जुवेकर यांनी सांगितले. ‘टेक्निकल अर्टिस्टिक स्केटिंग’ या क्रीडा प्रकाराला जेवढी मिळायला हवी तेवढी मान्यता मिळाली नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.

‘स्केटआर्ट’ कार्यक्रमामध्ये ९ ते २६ या वयोगटातील मुले मुली सहभागी होणार असून या कार्यक्रमासाठी जेष्ठ नृत्यांगना अनुराधा गांधी (ओडिसी) सई ओगले (कथक) आणि तेजस गर्भे (पाश्चिमात्य) यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.