Dehugaon : कर्तव्य फाऊंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त सदस्यांचा अवयवदानाचा संकल्प

एमपीसी न्यूज – कर्तव्य फाऊंडेशनच्या तिसर्‍या वर्धापनदिननिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेशाचे वाटप अशा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच फाऊंडेशनच्या 25 सदस्यांनी अवयवदानाचा संकल्प सोडला.

देहूगावातील सरस्वती लॉन्स येथे शनिवारी फाऊंडेशनचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, ओंकार डाईज कंपनीचे एमडी भालचंद्र कोलते, केमिकल्स मंत्रालयाचे सदस्य कनन नांबियार, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, गुरूनानक विद्यालयाचे प्राचार्य ह. भ.प. ज्ञानेश्वर घाडगे, नेल्डा संस्थेचे संस्थापक वेदार्थ देशपांडे, धिरेंद्र अ‍ॅडव्हरटायजिंगचे धीरेंद्र सेंगर, उद्योजक रमेश आगवणे, संत तुकाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर जगताप, संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लुटे मॅडम, अ‍ॅटोस सिंटेलचे साईनाथ आडकर, विशाल नेवाळे, गणेश गौघुले, आशा नवले आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल नामदेव वांगडे, कुलदीप आंबेकर, पर्यावरण क्षेत्रातील सोमनाथ मुसुगडे, पानी फाऊंडेशन अंतर्गत जलसंधारणात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मयूर कर्णे, क्रीडा क्षेत्रातील क्रांतीसूर्य दाभाडे यांना ‘कर्तव्यदक्ष’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने वर्षभरात तब्बल 51 विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, याचा अहवाल फाऊंडेशनच्या सदस्यांनी सादर केला. तसेच प्रत्येक महिन्यात नागरिकांना अल्पदरात शुध्द पाणी, गरजूंना रेशन धान्य वाटप तर मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी आर्थिक मदत असे उपक्रम फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येतात.

भारतीय नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी विविध गैरसमज आहेत. त्यामुळे देशात आज हजारो गरजू लोकांना अवयव मिळत नाही. तर श्रीलंकासारखा देश अवयव दानात जगात एक नंबर आहे. काही सामाजिक संस्थांमार्फत अवयव दानाविषयी चळवळ राबविली जात आहे. याच प्रेरणेतून कर्तव्य फाऊंडेशनच्या 25 सदस्यांनी अवयवदानाचा संकल्प सोडल्याची माहिती सदस्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.