Pimpri : सिंधी बांधवाच्या चालिहो उत्सवाला प्रारंभ

एमपीसी न्यूज – सिंधी बांधवांच्या चालिहो उत्सवाला मंगळवार (दि. 16) पासून उत्साहात सुरुवात झाली. बाबा झुलेलाल मंदिरात ४० दिवसांसाठी ज्योत प्रज्ज्वलित करुन ठेवण्यात आली.

सिंधी समाजाचे आराध्य दैवत बाबा झुलेलाल यांनी १०६६ वर्षापूर्वी सिंधी समाज बांधवांना विश्वशांती, बंधुभाव यांचा संदेश दिला. सर्व धर्मियांनी एकोप्याने या समाजात रहावे, सलोखा वाढावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची शिकवण बाबा झुलेलाल यांनी त्यावेळी दिली होती. चालिहो साहेब हा उत्सव सिंधी बांधव दरवर्षी चाळीस दिवस साजरा करतात.

या चाळीस दिवसात उपवास केले जातात, त्याशिवाय या काळात आपण केलेल्या पापांची कबुलीही दिली जाते. या काळात मांसाहार, मद्यप्राशन केले जात नाही. सिंधी बांधवांनी मोठ्या संख्येने बाबा झुलेलाल मंदिरात प्रज्ज्वलित केलेल्या ज्योतीचे दर्शन घेतले. या चाळीस दिवसाच्या कालावधीत मंदिरात भजन, कीर्तन, पालव आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे याचा लाभ घ्यावा असे झुलेलाल मंदिर ट्रस्टच्या वतीने आवाहन केले आहे.

बाबा छतुराम झुलेलाल मंदिर, मुख्य बाजार येथील मंदिरचे सचिव जवाहर कोटवानी, मास्टर बल्लूमल, लच्छु तुलसानी, प्रताप बजाज, भगवान खत्री, कुमार मोटवानी आदींनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.