Talegaon Dabhade : नाट्यगृह उभारणीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी देणार- बाळा भेगडे

साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर यांचा अमृतमहोत्सवी सोहळा साजरा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे शहराची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी नाट्यगृह उभारण्यात येणार असून या कामासाठी 25 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन कामगार, पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी दिले. मावळच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आगामी काळामध्ये सर्व पक्षांना बरोबरीने घेऊन काम करणार असे आश्वासन कामगार, पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केले. संगीततज्ञ, प्रवचनकार, कीर्तनकार व ज्येष्ठ संपादक सुरेश साखवळकर यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून भेगडे बोलत होते.

अमृतमहोत्सव गौरव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ रामचंद्र देखणे, स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, प्रा जोर्वेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

भेगडे पुढे म्हणाले,” मंत्रिपदाच्या माध्यमातून तळेगाव आणि मावळचा जास्तीतजास्त विकास कसा करता येईल याचा प्राधान्याने विचार केला जाईल. तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाची प्रतीक्षा संपली असून, लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे” तळेगाव दाभाडे शहराची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी नाट्यगृह उभारण्यात येणार असून या कामासाठी 25 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बाळा भेगडे यांनी दिले.
जीवनात एकाच दिवशी एवढं मोठं यश मिळत नाही. त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. साखवळकर बाईंनी शाळेत गणित शिकवलं नसते तर राजकारणातील गणित मला जमले नसते असेही बाळा भेगडे सांगायला विसरले नाहीत.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरेश साखवळकर यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 75 दिव्यांच्या ज्योतींनी त्यांचे औक्षण करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना साखवळकर म्हणाले, ” आयुष्याच्या सुरवातीला वाईट अनुभव येऊन पुढे चांगले दिवस आल्यास जीवन सुसह्य होते. पण सुरुवातीला आनंदी जीवन व्यतीत केल्यानंतर वृद्धापकाळी येणारे वाईट दिवस जगणे असह्य होते म्हणूनच प्रत्येकाने विचारपूर्वक वागले पाहिजे. भगवद्गीता, ज्ञानोबा तुकोबा यांचे विचार आचरणात आणायला हवेत ” संगीत नाटय कला सध्याच्या काळात उपेक्षित राहिली आहे. शासनाने त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, सुनीताताई साखवळकर, डाॅ रामचंद्र देखणे, सचिन चपळगावकर आदींची भाषणे झाली. या वेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, नगरसेवक अरूण भेगडे, अमोल शेटे, शोभाताई भेगडे व आजी माजी नगरसेवक, बाल गंधर्व संगीत मंडळ,कलापिनी व श्रीरंग कला निकेतन, तळेगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघ अशा विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर जिल्ह्यातील व तालुक्यातील पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब जांभुळकर, डाॅ अनंत परांजपे, प्रा जयंत जोर्वेकर, प्रभाकर ओव्हाळ, संतोष खांडगे,अॅड माधव भोंडे, नाना कुलकर्णी, वसंतराव भेगडे, प्रा दीपक बिचे, डाॅ प्रमोद बो-हाडे आदींनी केले होते. डाॅ विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत पुराणिक यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.