BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : भोसरीच्या तरुणाचा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज ? मंगळवारी करणार अर्ज दाखल

एमपीसी न्यूज- काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्य निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्यामुळे त्यांच्या जागी कोणाची निवड करायची या प्रश्नावर सध्या काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे पुढे येत असतानाच भोसरीमध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या गजानंद होसाळे या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाने आपण काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची इच्छा प्रकट केली आहे. एवढेच नाही तर उद्या मंगळवारी (दि. 23 ) पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे तो आपला अर्ज सादर करणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नवीन अध्यक्ष हा गांधी घराण्यातील नको असे सांगत त्यांनी अध्यक्ष शोधण्यास सांगितले. अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे पुढे आली मात्र अद्याप काँग्रेस कार्यकारिणीला अध्यक्षपद स्वीकारणारी व्यक्ती मिळू शकली नाही. काँग्रेसची ही स्थिती पाहुनच पुण्यातील भोसरी परिसरात राहणाऱ्या गजानंद चंद्रकांत होसाळे या तरुणाने काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे ठरवले आहे. उद्या मंगळवारी तसा तो अर्जही करणार आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे तो आपला अर्ज सादर करणार आहे.

गजानंद होसाळे हा मूळचा कर्नाटकातील बिदर येथील असून सध्या तो भोसरीतील एका कंपनीत काम करतो. होसाळे याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. बदल घडविण्याची वेळ आता आली आहे आणि हा बदल आपणच घडवू शकतो असा विश्वास निर्माण झाल्यामुळे मी हा निर्णय घेतला असल्याचे त्याने सांगितले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3