एमपीसी न्यूज – महापालिकेच्या यशंवतराव चव्हाण रूग्णालयासह इतर सर्व रूग्णालये आणि दवाखान्यांमधील जैव वैद्यकीय घनकचरा गोळा करण्यासाठी नॉनक्लोरोनेटेड बॅगा खरेदी करण्यात येणार आहेत. या 21 हजार 750 बॅगा खरेदी करण्याकरिता 3 लाख 85 हजार रूपये खर्च होणार आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी शहरात 32 दवाखाने आहेत. तर, आठ रूग्णालये आहेत. या रूग्णालयांमधील जैव वैद्यकीय घनकच-याची विल्हेवाट लावली जाते. हा कचरा गोळा करण्यासाठी नॉनक्लोरोनेटेड बॅगांचा वापर केला जातो. यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये पास्को एन्व्हायरलमेंटल सोल्यूशन यांचे लघुत्तम दर प्राप्त झाले होते. त्यानुसार, जैव वैद्यकीय घनकचरा गोळा करण्यासाठी पास्को एन्व्हायरलमेंटल सोल्यूशन यांच्याकडून प्लास्टीक बॅगा घेतल्या जातात. हा प्रकल्प 15 वर्षाकरिता पास्को एन्व्हायरलमेंटल सोल्युशन्स यांना चालविण्यास देण्यात आला आहे. त्यांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयासह महापालिकेचे सर्व दवाखाने आणि रूग्णालये यांच्याकडून प्लास्टीक बॅगांची मासिक तसेच वार्षिक मागणी घेण्याबाबत सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, सर्व रूग्णालयांनी त्यांची मागणी सादर केली आहे. सद्यस्थितीत वायसीएमसह सर्व दवाखाने, रूग्णालयांमध्ये नॉन क्लोरोनेटेड बॅगचा तुटवडा निर्माण झाला आहे. नविन निविदा तयार करण्याचे काम सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता विचारात घेता निविदा प्रक्रीयेस विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, रूग्णालये आणि वायसीएम रूग्णालयातील कामकाज सुरळीत राहण्यासाठी दहा महिन्यांकरिता नॉनक्लोरानेटेड बॅग खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये 27 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर आकाराच्या लाल रंगाच्या आठ हजार बॅगा आणि पिवळ्या रंगाच्या 13 हजार 750 बॅगा खरेदी करण्यात येणार आहेत.

या दोन्ही रंगाच्या 50 बॅगांच्या एका पाकीटाची किंमत 887 रूपये आहे. त्यानुसार, आठ हजार बॅगांच्या 160 पाकीटांची किंमत 1 लाख 41 हजार 920 रूपये होते. तर, 13 हजार 750 बॅगांच्या 275 पाकीटांची किंमत 2 लाख 43 हजार 925 रूपये होते. अशा एकूण 3 लाख 85 हजार रूपये किमतीच्या बॅगा खरेदी करण्यात येणार आहेत.