Chikhali : शस्त्राचा धाक दाखवून हॉटेलमध्ये लूटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ

एमपीसी न्यूज – शस्त्राचा धाक दाखवून हॉटेलमध्ये तोडफोड करत हॉटेलच्या काउंटरमधून रोकड चोरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन आठवड्यात शहरात चौथी घटना घडली आहे. भर दिवसा साने चौकातील एका हॉटेल चालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले आहे.

हिरामण समारामजी देवासी (वय 34, रा. त्रिवेणीनगर) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहित चंद्रकांत जुजगर (वय 22, रा. चिखली), दिनेश राम कोळी (वय 22, रा. तळवडे), तुकाराम म्हस्के, आकाश शिंगारे आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवासी यांचे साने चौकात महादेव प्युअर व्हेज हे हॉटेल आहे. रविवारी (दि. 21) दुपारी बाराच्या सुमारास सहाजण त्यांच्या हॉटेलमध्ये आले. त्यांनी देवासी यांच्या भावाला कोयता, चाकू, काठ्या, रॉड अशा घातक शस्त्रांचा धाक दाखवून हॉटेलच्या गल्ल्यातील सात हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपी रोहित आणि दिनेश या दोघांना अटक केली आहे.

यापूर्वी शनिवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास मेदनकरवाडी येथील हॉटेल शिवराजमध्ये चार जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून हॉटेलच्या काउंटर मधून 9 हजार 860 रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. काळूराम आनंदा खंडेभराड (वय 44, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल माऊली लष्करे, अमोल विनायक ओव्हाळ, संतोष ननावरे (तिघे रा. कडाचीवाडी, ता. खेड) आणि अन्य एक जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश ज्ञानेश्वर खराबी (वय 56, रा. चाकण) यांचे खराबवाडी येथे महाराजा हॉटेल आहे. बुधवारी (दि. 10) पहाटे अज्ञात चोरट्यांनी हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून हॉटेल मध्ये प्रवेश केला. हॉटेलमधून मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण 4 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.

तीन जणांनी मिळून देशी दारूच्या दुकानात भर दिवसा हैदोस घातला. दुकानदाराच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडत त्याच्यावर कोयत्याने वार करून लुटले. दुकानदार या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. ही घटना निगडी येथे भर दिवसा घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like