Pune : ‘विकास स्वर्गातून पडणार का ?’ राहुल बजाज यांचा मोदी सरकारला सवाल !

ऑटो सेक्टरमधील मंदीबद्दल व्यक्त केली चिंता

एमपीसी न्यूज- ऑटो सेक्टरला सध्या मंदीच्या समस्येने ग्रासले असून व्यावसायिक वाहने आणि दुचाक्यांच्या मागणीमध्ये कमालीची घट आली आहे. अशा परिस्थितीमध्ये विकास कोठून येणार ? विकास काय स्वर्गातून येणार का ? असा संतप्त सवाल करीत सुप्रसिद्ध उद्योगपती बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. बजाज ऑटोच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

ऑटो सेक्टर सध्या अतिशय गंभीर परिस्थितीमधून जात आहे. कार,व्यावसायिक वाहने, दुचाकी यांच्या मागणीमध्ये कमालीची घट झाली आहे. खासगी गुंतवणूक होत नाही अशा परिस्थितीत विकास कसा साध्य होणार ? विकास काय स्वर्गातून पडणार का ? ” असा सवाल करीत राहुल बजाज यांनी केंद्र सरकार चुकीची आकडेवारी देऊन लोकांची दिशाभूल करीत आहे. एकीकडे जागतिक बँकेच्या आकड्यावरून मागील तीन ते चार वर्षांपासून विकासाचा वेग मंदावला असताना सरकार सगळे काही आलबेल असल्याचे चित्र रंगवत आहे असा आरोप राहुल बजाज यांनी केला आहे.

राहुल बजाज यांचे पुत्र राजीव बजाज यांनी देखील मोदी सरकारच्या विविध योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इलेक्‍ट्रिक वाहन योजनेवर बोलताना राजीव बजाज म्हणाले की, भविष्यात ग्राहकांकडून इलेक्‍ट्रिक वाहन खरेदीला प्रतिसाद दिला नाही तर ऑटो सेक्टरमधील उद्योगांनी आपापली दुकाने बंद करायची का ?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.