Pimpri : खासदार डॉ. अमोल कोल्हे उद्या शहरात; आयुक्तांची भेट, पक्षाच्या नगरसेवकांची घेणार बैठक

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे उद्या (गुरुवारी)पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते शहरात येत आहेत. शिरुरमध्ये येत असलेल्या भोसरी मतदारसंघातील आणि शहरातील प्रलंबित प्रश्नांवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी डॉ. कोल्हे चर्चा करणार आहेत. तसेच पक्षाच्या नगरसेवकांचीही बैठक घेणार आहेत.

खासदार झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे पिंपरी-चिंचवड शहरात आले नव्हते. उद्या पहिल्यांदाच ते शहरात येत आहेत. शहरातील अवैध बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, शहरातील कचरा समस्या, नाशिक फाटा ते मोशी दरम्यानचे सहापदरी रस्ता रूंदीकरण, भोसरीचे रुग्णालय अशा विविध प्रलंबित प्रश्नांबाबत डॉ. कोल्हे हे महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्यासोबत दुपारी चार वाजता चर्चा करणार आहेत. विविध प्रलंबित प्रश्वांचा आढावा घेणार आहेत.

त्यानंतर पिंपरी, खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पदाधिकारी आणि नगरसेवकांची बैठक घेणार आहे. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.