Pune : अपारंपरिक उर्जास्त्रोतांच्या वापरांस पुणेकरांचे प्राधान्य

एमपीसी न्यूज- सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडुळखत आदी अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर करणार्‍या नागरिकांना पुणे महापालिकेतर्फे मिळकत करामध्ये 5 ते 10 टक्क्यांची सूट दिली जाते. पुणे शहरातील तब्बल 86 हजार 836 मिळकतींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत पुणेकर अपारंपरिक उर्जास्त्रोतांच्या वापरांस प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेतर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालातून ही बाब समोर आली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये शहराचा विकास झपाट्याने होत आहे. अत्यंत वेगाने विस्तारणार्‍या नागरीकरणामुळे शहर विकासाच्या दिशेने धावत असले तरी पर्यावरणाचा मात्र र्‍हास होत आहे. त्यामुळे एकेकाळी सायकलींचे शहर अशी ओळख असणारे पुणे आता आशिया खंडातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मोडते.

त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यावर महापालिकेतर्फे भर देण्यात येत आहे. नागरिकांनी अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर करावा यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून प्रोत्साहन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शहरातील पारंपरिक उर्जा स्त्रोतांवरचा ताण कमी करण्यासाठी सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत आदी अपारंपरिक उर्जास्त्रोतांचा वापर करणार्‍या नागरिकांना महापालिकेतर्फे करआकारणीमध्ये 5 ते 10 टक्के सूट दिली जाते. या योजनेचा फायदा शहरातील 86 हजार 836 मिळकतधारकांनी घेतला आहे. दहा वर्षांपूर्वी या योजनेचा लाभ घेणार्‍यांचे प्रमाण फक्त 1265 इतके होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.