Nigdi : मॉडर्नच्या मुलांनी जाणली निवडणूक प्रक्रिया

एमपीसी न्यूज – उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज माघार घेणे, डिपॉझिट भरणे, निवडणूक चिन्ह, आचारसंहिता, प्रचार आणि प्रत्यक्षात लोकशाही गुप्त मतदानाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. निमित्त होते मॉडर्न हायस्कुलमधील विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीचे. दोन महिन्यावर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांना निवडणूक आणि लोकशाही पद्धतीने मतदान या सर्व बाबींची माहिती देण्यात आली.

यावेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आठ मतदान कक्ष उभारण्यात आले होते. रंगीत मतपत्रिकेत एकूण बारा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळी शालेय प्रतिनिधींनी उमेदवारी अर्ज भरला, अनामत रक्कम जमा केली, निवडणूक चिन्ह म्हणून शालेय साहित्याचे चिन्ह देण्यात आले. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रचारासाठी वेळ देण्यात आला.

प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी विद्यार्थीच मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सेवक, पोलीस झाले होते. मतदान करताना मतदार यादीत नाव पाहिले जात होते. आधार कार्ड पाहून, बोटावर शाई लावूनच मतदान करू दिले जात होते. मतदान पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणी करून निकाल जाहीर करून विजयी उमेदवार घोषित करण्यात आले.

या निवडणूक प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने होणारी निवडणूक प्रक्रिया शालेय जीवनापासून समजेल आणि लोकशाही अधिक बळकट होईल असा विश्वास संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार यांनी व्यक्त केला. यावेळी प्राचार्य सतीश गवळी, संस्था सदस्य राजीव कुटे, सुरेखा कामथे आदी उपस्थित होते. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षक तसेच मतदान प्रमुख गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके, गंगाधर वाघमारे, विजय गायकवाड, अमोल नवलपुरे, कुसुम पाडळे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.