Talegaon Dabhade : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मावळचा मदतीचा हात

एमपीसी न्यूज- सध्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले असून पुराने थैमान घातले आहे. पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मावळ मधील जनता सक्रिय झाली असून दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा ओघ सुरु आहे. मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे आणि मावळातील पन्नास कार्यकर्ते ही मदत घेऊन कोल्हापूरकडे आज दुपारी प्रयाण करणार आहेत.

पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती भयानक असून, हजारो नागरिक पुरात अडकले आहेत, अनेकजण विस्थापित झाले असून त्यांना मदतीची गरज आहे. आपल्या जवळील कपडे, धान्य, भाजीपाला, दूध, ब्लँकेट, औषधे, फूड पॅकेट, चादरी, सॅनिटरी नॅपकिन्स, तेल, ब्रश, टूथपेस्ट अशा जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचे आवाहन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत मावळ मधील जनतेने सढळ हाताने जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा ओघ सुरु केला. रोजच्या गरजेच्या वस्तू आणि जनावरांसाठी चारा घेऊन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे स्वतः आपल्या 50 कार्यकर्त्यांना घेऊन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन ही मदत पोहोचवणार आहेत.

यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, माजी उपसभापती शांताराम कदम,मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे, जिल्हा कार्याध्यक्ष युवा मोर्चा बाळासाहेब घोटकुले व इतर पदाधिकारी जाणार आहेत. यापूर्वी काल, गुरुवारी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांची वैद्यकीय व आपत्ती व्यवस्थापन टिम डॉ ताराचंद कराळे नगरसेवक पांडुरंग वहिले आरोग्य मित्र नवनाथ बोडके यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर सांगली साठी रवाना झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like