Pune : ‘शहरातील नद्यांना, ओढ्यांना मोकळा श्वास घेऊ द्यावा’ पर्यावरणप्रेमींची एकमुखी मागणी

एमपीसी न्यूज- शहरातील सर्वच नद्यांना, ओढ्यांना मोकळा श्वास घेऊ द्यावा, पाणलोट क्षेत्रावर झालेली अतिक्रमणे युद्धपातळीवर काढण्यात यावीत. नदीकाठावरील बांधकामं नियंत्रित होण्यासाठी मोजणीवाटे आलेखित झालेल्या ब्लू-लाईन व रेड-लाईन या पूर्वीच्या, मूळ होत्या, त्याच ठिकाणी पुनश्च अधोरेखीत कराव्यात या आणि अशा अनेक मागण्या पर्यावरण विषयक जनजागृती करणाऱ्या अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी केल्या आहेत. पुणे येथे पिंपरी-चिंचवड व पुणे शहर भागात गेल्या आठवड्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थिती संबंधी माहिती देण्यासाठी रविवारी(दि. ११) पुणे पत्रकार संघामध्ये आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये या मागण्यांची सनद नागरिकांनी प्रस्तुत केली. 

या चर्चासत्रामध्ये खासदार वंदना चव्हाण, आर्किटेक्ट सारंग यादवडकर, भूजल सर्वेक्षण विभागाचे अभ्यासक शशांक देशपांडे, डॉ. अनुपम सराफ, नरेंद्र चुघ, ऍड. असीम सरोदे, मनीष घोरपडे, तुषार सरोदे व शताक्षी गावडे आदींनी सहभाग घेतला.

सारंग यादवडकर व शशांक देशपांडे यांनी सखोल अभ्यासातून निर्मित चित्रफितींद्वारे पुणे परिसरातील नद्या व भूजलाचे वास्तव उपस्थितांपुढे मांडले. गूगलमॅपच्या आधारे मागील काळात प्रशासनाच्या संमतीने, वा प्रशासनाची नजर चुकवून, पुण्यातील नदीलगतचे विविध ठिकाणचे भूभाग बांधकामांसाठी अक्षरशः ओढून घेतल्याची माहिती सचित्र पुराव्यानिशी सादर केली. जागतिक तापमानवाढीमुळे एकावेळी पडणाऱ्या पावसाचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत जाणार असल्याचा इशारा देण्यात आला. भूजल पुनर्भरणाचे महत्व सांगताना देशपांडे यांनी शहर अति-काँक्रीटमय झाल्याने पावसाचे पाणी जागेवर मुरण्याचे प्रमाण अतिशय खालावले आहे व त्याचा पुराशी थेट संबंध असल्याचे निदर्शनास आणून दिले.

डॉ. अनुपम सराफ यांनी बाणेर येथील देवनदी पुनरुज्जीवनाविषयी सांगितले. तुषार सरोदे व शताक्षी गावडे या तरुण छायाचित्रकारांनी ऐन पूरकाळात नदीकाठ पिंजून काढत तेथील वास्तव टिपले; त्यांच्या चित्रफितीतून नदीकाठच्या वस्त्यांमधील रहिवाश्यांची झालेली दैना पुढे आली. जल-बिरादरीच्या नरेंद्र चुघ यांनी पवना नदीच्या पात्रात पाऊस जास्त पडूनही अडथळे नसलेल्या ठिकाणी पूर उद्भवला नाही असे लक्षात आणून दिले. पर्यावरण रक्षणासाठी अनेक कायदे उपलब्ध असूनही न्यायालय किंवा हरित लवादाने दिलेल्या निवाड्यांवर अंमलबजावणीत शासन दिरंगाई करत असल्याचे ऍड. असीम सरोदे यांनी सांगितले. जीवितनदीच्या वतीने बोलताना श्री मनीष घोरपडे यांनी पुण्यातील नद्यांवर नागरिकांनी ठिकठिकाणी गटागटाने राडारोडा किंवा कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवून नदीप्रदूषण रोखण्यात मदत करावी असे आवाहन केले.

याप्रसंगी वसुंधरा अभियान, जीवितनदी, जलदेवता अभियान, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, पवना-इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन, रामनदी स्वच्छता अभियान, देवनदी स्वच्छता अभियान, भूजल अभियान, सेव्ह पुणे हिल्स फोरम, तळजाई हिल्स ग्रूप, पाषाण-बाणेर टेकडी बचाव समिती, एच सी एम टी आर कृती समिती, एरिया सभा असोसिएशन ऑफ पुणे, समग्र नदी परिवार अशा पुणे शहरातील अनेक नागरी संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. दीपक श्रोते यांनी सूत्रसंचालन केले.

संवादातून निष्पन्न झालेली पुढील मागण्यांची सनद नागरिकांनी प्रस्तुत केली :

१) शहरातील सर्वच नद्यांना, ओढ्यांना मोकळा श्वास घेऊ द्यावा.
२) नद्या, नाले, ओढे, पाणलोट क्षेत्र यांवर झालेली, कायदेशीर असो वा बेकादेशीर, सर्वच अतिक्रमणे युद्धपातळीवर काढण्यात यावीत.
३) नदी काठावरील बांधकामं नियंत्रित होण्यासाठी मोजणीवाटे आलेखित झालेल्या ब्लू-लाईन व रेड-लाईन या पूर्वीच्या, मूळ होत्या, त्याच ठिकाणी पुनश्च अधोरेखीत कराव्यात.
४) नदी, नाले, ओढे व पाणलोट क्षेत्रावर कुठल्याही प्रकल्पांद्वारे जसे रस्ते, विकास, सुशोभीकरण इत्यादींमुळे होणारे कुठल्याही प्रकारचे, क्षमतेचे, शासकीय, निम-शासकीय वा खाजगी अतिक्रमण नको.
५) नदी की आझादी – नदीला नैसर्गिक हक्काची नदीतटीय व पूरमैदानी जमीन परत देण्यात यावी.
६) संपूर्ण पाणलोट क्षेत्र आहे त्या नैसर्गिक स्थितीत वाचवले गेले पाहिजे व त्याचे नैसर्गिक पुनर्स्थापन व पुनरुज्जीवन करण्यात यावे.
७) राजकीय पक्ष-नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांची नदी, नाले, ओढे, टेकड्या, व समग्र पाणलोट क्षेत्र या नैसर्गिक स्रोतांबाबतीत जबाबदारी निश्चित करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.