Chikhali: पूरग्रस्तांसाठी चिखलीतून जीवनावश्यक वस्तूंचे दोन टेम्पो रवाना

माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – अतिवृष्टी आणि पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या राबविलेल्या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. औषधे, चपाती, शेंदगाणे चटणी, लोणचे, पाणी यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दोन ट्रक सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.

दत्ता काका साने स्पोर्टस् फाऊंडेशन आणि वीर अभिमन्यू फ्रेंडस सर्कल यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा हा उपक्रम चिखली परिसरात राबविला होता. त्याला नागरिकांना मोठा प्रतिसाद देत आपल्या परिने जीवनावश्यक वस्तू दिल्या. महिला बचत गटांनी देखील मोठी मदत केली. त्यामुळे दोन टेम्पो जीवनावश्यक साहित्य जमा झाले. हे साहित्य घेऊन माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने सांगलीला रवाना झाले आहेत.

साने म्हणाले, “कोल्हापूर व सांगली येथील महापुराने मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्या भावनेतून सर्व नागरिक आपल्या परिने मदत करत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दोन ट्रक घेऊन सांगलीला आलो आहोत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.