Hinjawadi : मालमत्तेवर कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने तरुणाची तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी मालमत्तेवर तीन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने तीन जणांनी मिळून तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली. ही घटना बावधन येथे 10 फेब्रुवारी ते 12 ऑगस्ट 2019 या कालावधीत घडली.

मकरंद शिवाजी ऐवळे (वय 29, रा. बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सचिन वसंतराव काळे (रा. लातूर), रवीकुमार आदा (रा. हैद्राबाद), बालाप्रसाद वसंतराव काळे (रा. लातूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकरंद यांना व्यवसाय करायचा आहे. व्यवसायासाठी भांडवल उभारण्यासाठी त्यांनी त्यांच्या मालमत्तेवर कर्ज घेण्याचे ठरवले. मकरंद यांच्या मालमत्तेवर तीन कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आरोपींनी आमिष दाखवले. मकरंद यांच्याकडून सचिन आणि रवीकुमार यांनी कागदपत्रे घेतली. कर्ज मंजूर करण्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून तीन लाख रुपये घेतले. पैसे घेऊन कर्ज मंजूर केले नाही. दिलेल्या पैशांचा आरोपींनी अपहार केला. आरोपी बाळाप्रसाद याने मकरंद यांच्या वडिलांना फोन करून ‘या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. माझे नाव घेतले तर सोडणार नाही’ अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.