Chakan : शिवशाही बसची कारला धडक; ज्येष्ठ नागरिक गंभीर

एमपीसी न्यूज – सिग्नलवर थांबलेल्या कारला शिवशाही बसने मागून धडक दिली. कार समोरच्या मोपेड दुचाकीला धडकली. मोपेड दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिक या अपघातात गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. 12) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास कुरुळी गावाजवळ स्पायसर फाटा येथे घडला.

सुनील महादेव केदारी (वय 61, रा. चाकण) असे जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. विकास रमेश पानसरे (वय 24, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कारचालक सोनिक हरिदास गाडेकर (वय 30, रा. फलटण, सातारा) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनिक त्याच्या कार (एम एच 11 / बी एच 8033) मधून पुणे-नाशिक महामार्गावरून जात होते. कुरुळी गावाजवळ स्पायसर फाट्यावर आले असता सिग्नल बंद असल्याने ते सिग्नलवर थांबले. दरम्यान, मागच्या बाजूने आलेल्या शिवशाही बसने (एम एच 14 / जी यु 0363) सोनिक यांच्या कारला मागून धडक दिली. जोरात धडक बसल्यामुळे कार पुढे जाऊन समोर थांबलेल्या मोपेड दुचाकीला (एम एच 14 / एफ ए 4282) धडकली.

मोपेड दुचाकीवर जखमी सुनील केदारी थांबले होते. दुचाकीला बसलेल्या धडकेत सुनील हे उडून सोनिक यांच्या कारच्या बोनेटवर पडले. या अपघातात सुनील गंभीर जखमी झाले. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात शिवशाही बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.