BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: वाहकाने आठ तासात पीएमपीला मिळवून दिले लाखाचे उत्पन्न

स्टॅन्ड बुकिंगच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, प्रशासनाकडून वाहकाचा गौरव

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) भोसरी बीआरटी स्थानकावर गुरुवारी कामाच्या वेळेत वाहकाने आतापर्यंतचे विक्रमी 1 लाख 1 हजार 402 रुपयांचे उत्पन्न एका दिवसामध्ये मिळवून दिले आहे. या कौतुकास्पद कामगिरीनिमित्त वाहक कुंदन काळे यांचा महापौर राहुल जाधव यांनी सत्कार केला. पीएमपीच्या सर्व आगारातील हा बुकींग भरणा सर्वाधिक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

भोसरीतील बीआरटी स्थानक येथे हा सत्कार शुक्रवारी करण्यात आला. भोसरीचे आगर व्यवस्थापक शांताराम वाघेरे, प्रमुख काळुराम लांडगे यावेळी उपस्थित होते.

रक्षाबंधन हा पीएमपीचा सर्वाधिक उत्पन्नाचा दिवस असतो. भोसरी आगारला यंदा मिळालेले उत्पन्न गेल्या काही वर्षांतील रक्षाबंधनाच्या तुलनेत सर्वाधिक ठरले आहे असे भोसरीचे आगर व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांनी सांगितले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत पीएमपी प्रशासनामार्फत भोसरीच्या बीआरटी स्थानकात नेह्मीच्या वेळेत रोजच्या 97 आणि अधिकच्या 9 गाड्या रस्त्यावर उतरविल्या होत्या.

सकाळच्या वेळेत म्हणजेच, पहाटे पाच ते दुपारी एक या वेळेत आणि दुपारनंतर रात्री 12 वाजेपर्यंत या बस प्रवाशांच्या सेवेत होत्या. त्यामध्ये 9 बस जादा होत्या. परिणामी, भोसरी आगारला गुरूवारी 15 लाखांचे उत्पन्न मिळाले. यात आतापर्यंतचे विक्रमी 1 लाख 1 हजार 402 रुपयांचे बुकिंग उत्पन्न कुंदन काळे या वाहकाने मिळवून दिले आहे. या कामगिरीनिमित्त वाहक कुंदन काळे यांचे कौतुक होत आहे.

भोसरीतील पीएमपीच्या भोसरी-सद्गुरुनगर आगारामध्ये कुंदन काळे कार्यरत आहेत. काळे यांनी भोसरी टर्मिनल स्थानकावर सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेमध्ये वेगवेगळ्या रूटच्या बसची तिकिटे प्रवाशांना देऊन पीएमपीला गुरुवारी एक लाख 1 हजार 402 तर या आधीही 26 जानेवारी 2019 रोजी देखील एकाच दिवशी 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.

वाघेरे म्हणाले, ” विविध सण, यात्रा काळातही कामाच्या वेळेत आतापर्यंतचे उत्पन्न 25 हजारांच्या आसपास होते. मात्र, कुंदन काळे यांनी आतापर्यंतचे विक्रमी 1 लाखाहून अधिक उत्पन्न एका दिवसामध्ये मिळवून दिले आहे. काळे यांनी स्टॅन्ड बुकिंगच्या माध्यमातून पाच रूपयांपासून 70 रुपयापर्यंतच्या तिकिटांचे वाटप केले. कामाप्रती असलेला उत्साह यातून प्रतीत होतो. त्यामुळे आगाराच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

HB_POST_END_FTR-A2

.