पिंपरी-चिंचवड महापालिका निकालाचे चित्र आज साडेचारपर्यंत होणार स्पष्ट

पहिला निकाल दुपारी साडेबारापर्यंत अपेक्षित

सकाळी दहापासून 11 निवडणूक कार्यालयांवर होणार मतमोजणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतमोजणीला आज (गुरुवारी) सकाळी 10 वाजतापासून सुरुवात होणार आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार अडीच तासात एका प्रभागाची मतमोजणी यानुसार साधारण चार फे-यात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निकालाचे चित्र संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

एकूण 11 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामंध्ये (आर.ओ.ऑफीस) सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी प्रभागानुसार होणार आहे. एका आरओ कार्यालयाअंतर्गत तीन प्रभाग नेमून दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक आरओ ऑफीसमध्ये दहा ते साडेबारा या पहिल्या अडीच तासाच्या टप्प्यात एका प्रभागाचा अ, ब, क, व ड अशा चारही जागांचा निकाल लागेल. त्यानंतर दुसरा प्रभाग व त्यानंतर तिसरा असे अडीच-अडीच तासाच्या अंतराने तीनही प्रभागांचे निकाल जाहीर केले जातील. सरासरी एका प्रभागासाठी 35 हजार मतदान झालेले आहे. त्यानुसार चार फे-यांमध्ये निकाल स्पष्ट होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक आयुक्त यशवंत माने यांनी दिली.

यामध्ये आरओ कार्यालयात 14 टेबल मतमोजणीसाठी असतील. ज्यावर एका प्रभागातील चारही जागांची एकाचवेळी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार संबंधित प्रभागातील चारही जागांच्या उमेदवाराला मतमोजणीच्या वेळी कार्यालयात बोलविण्यात येईल. अशा प्रकारे 11 ठिकाणी 32 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. या प्रभागांचे मतमोजणी केंद्र पुढील प्रमाणे

1) प्रभाग क्रमांक 1, 2 व 11 साठी स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल चिखली येथे होणार मतमोजणी

2) प्रभाग क्रमांक 3, 6 व 8 साठी – संत ज्ञानेश्वर क्रीडा संकूल भोसरी येथे होणार मतमोजणी

3) प्रभाग क्रमांक 4, 5 व 7 साठी अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे मतमोजणी

4)  प्रभाग क्रमांक 9, 10 व 20 साठी  क प्रभाग कार्यालय, एमआयडीसी भोसरी

5) प्रभाग क्रमांक 12, 13  व 14 साठी अण्णाभाऊसाठे सांस्कृतिक भवन, निगडी प्राधिकरण

6) प्रभाग क्रमांक 15, 16  व 17 साठी हेडगेवार भवन, निगडी प्राधिकरण

7) प्रभाग क्रमांक 18, 19 व 21 साठी ब प्रभाग कार्यालय, चिंचवड

8) प्रभाग क्रमांक 22, 23 व 27 साठी नवीन मनपा शाळा इमारत, थेरगाव

9) प्रभाग क्रमांक 24 , 25  व 26 साठी ड प्रभाग कार्यालय, रहाटणी

10) प्रभाग क्रमांक 28, 29 व 30 साठी साई शारदा महिला आयटीआय, कासारवाडी

11) प्रभाग क्रमांक 31 व 32 साठी पिंपरी-चिंचवड बॅडमिंटन हॉल, पीडब्ल्यूडी मैदान सांगवी

या मत मोजणीसाठी एकूण तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील प्रभागानुसार पोलिसांतर्फे विशेष यंत्रणाही उद्या कार्यरत असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.