महापालिकेच्या 11 केंद्रामध्ये शांततेत मतमोजणी

सर्व प्रभागामध्ये साधारणत: दहा वाजण्याच्या सुमारास मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, काही प्रभागांमध्ये प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उशिर झाला. "ब’ क्षेत्रीय कार्यालयातील मतमोजणी केंद्रावर साधारणत: साडेदहा वाजण्याच्या पुढे मतमोजणीला सुरूवात झाली. प्रथम टपाल मतमोजणी सुरु करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात वोटिंग मशीनच्या मतांना सुरूवात करण्यात आली.
पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातच उमेदवार विजयी होणार असल्याचे समजल्यानंतर पराभूत उमेदवारांनी काढता पाय घेतला. त्यानंतर केवळ अनौपचारिकता म्हणून अंतिम फेरी घेण्यात आली. मात्र, काही ठिकाणी अगदी दोनशे ते तीनशे मतांनी आघाडी घेत विजय झाला.
मिरवणुकीमध्ये डिजे लावण्यास बंदी
प्रभागातील विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास तसेच, डिजे लावण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे पोलिसांनी यापूर्वीच सुचना दिल्या होत्या. त्यामुळे नियम मोडल्यास अथवा अशा प्रकारे विजयी मिरवणूक काढल्यास संबंधित उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी उमेदवारांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी गस्त वाढवली होती. पिंपरी, भाटनगर, पिंपरी बाजारपेठ याठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
गुलाल, आतषबाजीने जल्लोष
प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्या व दुसऱ्या फेरीतच चित्र स्पष्ट झाल्याने पराभूत उमेदवाराचे कार्यकर्ते तेथून निघून गेले. तर, विजयी उमेदावरांनी घोषणाबाजी सुरु केली. उमेदवार बाहेर पडताच त्याला उचलून घेतले. भंडारा, गुलालाची उधळण आणि फटाके वाटजवून जल्लोष करण्यात आला.
चिंचवडमध्ये दिग्गजांना चारली धूळ
चिंचवड, श्रीधनगर हा शांत परिसर म्हणून ओळख आहे. येथे संघ आणि भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे. येथे भारत केसरी विजय गावडे, विद्यमान नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, गुरुबक्ष पेहलानी, संदीप चिंचवडे यांना पराभव स्वीकाराला लागला. तर, भाजपकडून सुरेश भोईर यांनी अनपेक्षितपणे आघाडी घेऊन दुसऱ्या फेरीतच प्रचंड आघाडी घेतली होती.