बाटला हाउस फिल्म – एक कौतुकास्पद धाडस

(हर्षल आल्पे)

एमपीसी न्यूज- खर तर चालू असलेल्या केसवर चित्रपट काढायचा म्हणजे फारच जिकरीच काम असत. एखादी ही घटना चुकीच्या आधारावर दाखवली तर त्याचा केसवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. शिवाय कोर्टाची बेअदबी केल्याचा ठपकाही ठेवला जाऊ शकतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला चित्रपटकर्ता किवा कलेतला कोणीही फारसा या वाटेला जात नाही. पण दिग्दर्शक निखील अडवानी आणि त्याच्या टीमने मात्र बाटला हाउसच शिवधनुष्य अगदी लीलया पेललंय अस चित्रपट पाहताना जाणवत.

सिनेमाच्या सुरवातीपासूनच दिग्दर्शकाने आपली अलिप्तता कुठेही सोडलेली नाही. फक्त सगळ्या बाजू लोकांसमोर ठेवून फक्त एक गोष्ट मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शिवाय त्या वेळच्या राजकीय लोकांनीही त्याला दिलेली फोडणी, त्यांची वक्तव्ये कुठेही त्यावर भाष्य न करता जशीच्या तशी दाखवली आहेत.

दिल्ली पोलिसांनी केलेला (किवा झालेला ) एक एन्काउंटर जो खरा आहे की खोटा यावरच्या सगळ्या बाजू आणि त्यातील नाट्य शोधण्याचा चित्रपटात दिसतो. यामध्ये एक इन्स्पेक्टरही मरण पावला आहे. ज्या मुलांना मारल ती निर्दोष होती का ? त्यांचा खरच आतंकवादाशी काही संबंध होता का ? आणि पोलिसांनी केलेली ही कारवाई बनावट होती का ? अश्या असंख्य प्रश्नांचा मागोवा हा सिनेमा घेतो. या प्रश्नांबरोबरच फिरत आपण कथेत तल्लीन होऊन जातो.
या एन्काउंटरचे सूत्रधार असलेले संजय कुमार यादव (सिनेमातील नाव ) यांना झालेला मानसिक त्रास. त्यांच्या छातीला चाटून गेलेली गोळी, तिचा होणारा आभास, त्यांचा आत्महत्येचा विचार, हे सगळ पाहून आपण भारावून आणि हेलावून जातो. पोलिसांना एखादी केस सोडवताना कोणकोणत्या दिव्यातून जाव लागत आणि केस सुरु झाल्यावरही त्यांच्या मागची विघ्न कमी होतात का ? हा प्रश्न पडतो. शिवाय या सगळ्यात घरगुती समस्यांना ही तोंड द्यावच लागतं. या सगळ्यात पोलिसांना घरच्यांची आणि आपल्या लोकांची साथ मिळाली तर ते निश्चित आपल काम चोख बजावू शकतात. चित्रपट या गोष्टीवर सुद्धा प्रकाशझोत टाकतो.

यातील मुख्य भूमिका जॉन अब्राहमने चांगलीच वठवली आहे. अत्यंत संयत आणि विचार करून त्याने ही भूमिका केल्याच जाणवत. मानसिक त्रास आणि त्यानंतर मिळालेला आत्मविश्वास हे त्याने उत्तम दाखवले आहे. लेखक रितेश शाहने ही फिल्म अत्यंत वास्तवाच्या जवळ जाणारी लिहिली आहे. ही तारेवरची कसरत त्याने चांगली सांभाळली आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरने जॉनच्या पत्नीची भूमिका अत्यंत सफाईदारपणे साकारली आहे. आधी पतीशी घटस्फोट घ्यायचा विचार करणारी, पतीच्या द्वंद्वात समर्थ साथ देणारी. शिवाय याच मानसिक अवस्थेत असताना त्या घटनेचं वार्तांकन करण्याची जवाबदारी पडल्यावर त्या मानसिक अवस्थेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी व्यक्तिरेखा म्हणजे निव्वळ लाजवाब. अभिनेता रविकिशन याने साकारलेला के .के वर्मा जो या सगळ्यात मारला गेलेला आहे. तो उत्तम साकारला आहे. सगळ्याच अभिनेत्यांनी आपापली काम व्यवस्थित पार पाड्ल्यानेच हा सिनेमा उठावदार झाला आहे. चित्रपटाच संगीत ही अगदी विषयानुरूप आणि व्यावसायिक गणित लक्षात घेऊन केलेलं आहे.

शेवटी इतकच

या कथेतला आणि घटनेतला थरार अनुभवायचा असेल आणि एक वास्तववादी नाट्य पाहायचं असेल तर हा सिनेमा एकदा तरी पाहायलाच हवा. पोलिसांची मनोभूमिका समजावून देणारे काही चित्रपट असतात, त्याचं माणूसपण अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे आणि त्यामुळेच एकदातरी हा अनुभव आपण घ्यायला हरकत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.