Pimpri : द्रुतगती मार्गावर 70 ठिकाणी माहिती फलक लागले; आमदार लक्ष्मण जगताप यांची माहिती


एमपीसी न्यूज- पुणे-मुंबईद्रुतगती मार्गावरून जाताना कोणत्या वाहनांनी कोणत्या लेनमधून गाडी चालवावी याबाबत माहिती देण्यासाठी महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बाजूने 37 ठिकाणी, तर पुण्याच्या बाजूने 33 ठिकाणी फलक बसविले आहेत. तसेच या संपूर्ण महामार्गावर लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

आमदार जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एक्स्प्रेस हायवेवरून सुखकर प्रवास व्हावा यासाठी वाहतुकीचे काही नियम निश्चित करण्यात आले. परंतु, प्रशस्त असलेल्या या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. कार, जीप, टेम्पो या प्रकारच्या हलक्या वाहनांनी एक्स्प्रेस हायवेच्या मध्य लेनमधून, जड व अवजड वाहनांनी सर्व्हिस लेनलगतच्या डावीकडील लेनमधून तसेच वाहनांना ओलांडताना उजवीकडील लेनचा अवलंब करणे नियमाने बंधनकारक आहे. त्यामुळे उजवीकडील लेन कायम रिकामी राहून वाहनांना ओव्हरटेक करणे सोपे जाईल, असा त्यामागचा हेतू आहे.

परंतु, वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी असलेल्या लेनमधून अवजड वाहने सर्रासपणे चालविली जातात. तसेच या लेनमधून प्रवास करताना वाहनाचा ताशी 80 किलोमीटर वेग असणे आवश्यक असताना त्यापेक्षा कमी गतीने वाहने चालविली जात असल्याचेही कायम निदर्शनास येते. त्यासाठी एक्स्प्रेस हायवेच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी वाहतूक नियमांची व चिन्हांची माहिती देणारे तसेच वाहतूक नियम मोडल्यास केली जाणारी कारवाई आणि कायदेशीर दंडाबाबत माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.