Nashik News : अतिवृष्टी नुकसानीची 111 कोटींची मदत प्राप्त

दोन लाख शेतकर्‍यांना दिलासा

एमपीसी न्यूज : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीची दुसर्‍या टप्प्यातील 111 कोटींची मदत जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. मदतीपासून वंचित असलेल्या दोन लाख चार हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर ही मदत वर्ग केली जाणार आहे. राज्य शासनाकडून उशिरा का होईना, ही मदत प्राप्त झाल्याने शेतकर्‍यांना नववर्षात मोठा दिलासा मिळाला आहे.

जून व जुलै महिन्यात पाठ फिरवणार्‍या पावसाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यासह जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. नाशिक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली नसली तरी अनेक पिकांना अतिवृष्टिचा जोरदार तडाखा बसला. कांदा, मका, भात, ज्वारी, सोयाबीन ही पिके अतिवृष्टीमुळे आडवी झाली. त्याच बरोबर भाजिपाल्यालाही फटका बसला. एकूणच हातातोंडाशी आलेले पिक आडवे झाल्याने शेतकरी संकटात सापडला.

राज्य शासनाने युध्दपातळीवर पंचनामे पूर्ण करुन हेक्टरी दहा हजार व फळबागांना  हजार मदत जाहिर करत दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा केले जाइल, असे आश्वासन दिले होते. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3 लाख 66 हजार 830 शेतकर्‍यांचे नुकसान झाले. जिल्हाप्रशासनाने पंचनामे पूर्ण करत नुकसान भरपाईसाठी 242 कोटींचा मदतीचा प्रस्ताव पाठवला होता.

दिवाळीनंतर त्यापैकी 110 कोटीची मदत जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. एक लाख 62 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर ही मदत जमा करण्यात आली. मात्र, डिसेंबर महिना उजाडला तरी दुसर्‍या टप्प्यातील मदत प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे दोन लाखांहून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित होते. मदतीपासून वंचित रहावे लागल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची दिवाळी कडूच गेली.

करोना संकटामुळे सरकारी तिजोरित खडखडाट असल्याने मदत प्राप्त होण्याद विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. अखेर जानेवारीच्या अखेरीस का होईना ही मदत बळीराजाला दिली आहे. 111 कोटी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. युध्दपातळीवर ही मदत वंचित शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम सुरु आहे.

तालुकानिहाय दुसर्‍या टप्प्यातील मदत 

बागलाण – २,००,९४,३०९

देवळा – १३,५६,६५०

येवला – १०,९१,५१,१८२

चांदवड – १७,९२,४५,९५७

दिंडोरी – १३,७१,६९९

नाशिक – २,३१,०००

सिन्नर – १,९९,६१,४८

कळवण – १,७३,००,०००

त्र्यंबकेश्वर – ३,१८,७६,७००

पेठ – २,९७,१६,३००

सुरगाणा – ३,६२,२७,१६०

निफाड – ३९,४२,९०३

इगतपुरी – ३,८७,१५,६२३

मालेगाव – ४५,८८,७८,०१३

नांदगाव – १७,०२,७०,७५८

एकूण – १११,२५,८४,००२

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.