Dehuroad : प्रथमोपचारामुळे खंड्या पक्ष्याचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज- उडण्यासाठी धडपड करत असताना खूप दमल्यामुळे क्षीण झालेल्या खंड्या पक्ष्याचे प्राण एका पक्षीप्रेमीमुळे वाचले. त्याला वेळीच प्रथमोपचार मिळाले आणि त्याने पुन्हा आकाशात भरारी घेतली. ही घटना देहूरोड येथे मंगळवारी (दि. 27) घडली.

देहुरोड येथील निसर्गप्रेमी प्रवीण श्रीसुंदर नेहमी प्रमाणे मंगळवारी (दि. 27) कामावर जाताना दोन कामगार काहीतरी पहात उभे दिसले. त्यांना विचारले असता रस्त्याच्या कडेला उडण्यासाठी धडपड करताना तडफडत असलेला एक पक्षी दाखवला. उडण्याचे प्रयत्न करत होता पण काही जमत नव्हते. तो पक्षी खंड्या होता ते श्रीसुंदर यांनी त्वरित ओळखले. त्याला वाचवावे असे तिघांनाही वाटत असल्यामुळे तो पक्षी अलगद पकडून त्यांनी श्रीसुंदर यांच्याकडे दिला. श्रीसुंदर यांनी गाडीत असलेल्या स्वच्छ कपड्यात त्या पक्ष्याला ठेवून आपल्या ऑफिसमधे आणले.

त्याला एका खोक्यात ठेवले. खुप दमलेला पक्षी मात्र अजिबात घाबरत नव्हता. खंड्याला कुठे मार लागून जखम झाल्याचे दिसत नव्हते पण त्याच्यात फार ताकद राहिली नव्हती. कोणी पक्षीमित्र भेटावा म्हणून शोधाशोध घेतला पण काही संपर्क होईना. एवढ्यात श्रीसुंदर यांना अलाईव्हचे अध्यक्ष आणि पक्षी तज्ज्ञ उमेश वाघेला यांची आठवण आली. त्यांना फोनवरून जखमी खंड्याबद्दल सांगितले. वाघेला यांनी त्यांना दुसरे कुठेही नेण्याआधी अत्यावश्यक असलेल्या प्रथमोपचार देण्यासाठी सूचना दिल्या.

त्या प्रमाणे श्रीसुदंर यांनी खंड्याला कापशाच्या ओल्या बोळ्याने चोचीवर स्पर्श केला तर खंड्याने किंचित चोच उघडली, त्याला थेंब थेंब ग्लुकोजचे पाणी पाजले. त्यामुळे मलूल झालेल्या खंड्याला थोडी तरतरी आली. तो कोणतीही झटापट न करता प्रथमोपचाराला प्रतिसाद देत असल्यामुळे श्रीसुंदर यांचा धीर वाढला. त्यांनी वाघेला यांच्या पुढील सूचनेचे पालन करत मल्टिव्हिटामिनची गोळीची भुकटी करुन अल्पशा प्रमाणात पाण्याबरोबर खंड्याला पाजली. आपल्या ऑफिसच्या खिडकीजवळ खोक्यात खंड्याला ठेवले असता सुमारे तीन तासाच्या विश्रांतिनंतर खंड्या खोक्याच्या काठावर बसला. खिडकीबाहेर खोके ठेवताच दहा मिनिटांनी एकदम स्वस्थ झालेला खंड्या उडून समोरच्या झाडावर जाऊन बसला आणि थोड्याच वेळाने त्याने निसर्गात यशस्वी उड्डाण घेतले. निसर्गप्रेमी प्रवीण श्रीसुंदर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले.

अलाईव्हचे अध्यक्ष व पक्षी तज्ज्ञ उमेश वाघेला म्हणाले, “खंड्या हा भारतभर आणि सभोवतालच्या इतर देशातही पाणवठे, माळराने, जंगले, मनुष्यवस्ती, खारफुटीची जंगले असे सर्वच अधिवासांमध्ये आढळणारा सामान्य पक्षी आहे. उडताना अतिशय देखणा दिसणारा हा पक्षी मासे, बेडूक, पाली सरडे, छोटे साप, उंदीर खाणारा आहे. आपल्या भक्ष्याची शिकार करण्यासाठी पाठलाग करताना क्वचित प्रसंगी हे धडकतात आणि जखमी होतात. काही वेगवान गाड्यांची धडक सुद्धा अनेक पक्ष्यांना बसून पक्षी जायबंदी होतात. अश्यावेळी पक्ष्यांना प्रथमोपचार देणे खूप महत्त्वाचे असते. कोणत्याही दवाख्यान्यात किंवा प्राणी-पक्षीच्या अनाथालयात नेण्याआधी ते दूर असल्यामुळे योग्यवेळी त्यांना योग्य मार्गदर्शनानुसार प्रथमोपचार दिल्यास त्या पक्ष्याचा जीव वाचण्याची शक्यता वाढते”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.