Vadgaon Maval : मावळातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – शिक्षण हा आता प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे आपल्या मावळ तालुक्यातील एकही विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही भाजपचे युवा नेते व तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी दिली.

शेळके यांनी बुधवारी (28 ऑगस्ट) आंदर मावळ भागात गाव भेट दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते. दौऱ्याची सुरूवात कोंडिवडे गावातून झाली. कोंडिवडे, भोयरे, कशाळ, किवळे, पिचडवाडी, इंगळूण, पारिठेवाडी, अनसुटे, कुणे, कुणेवाडी, माळेगाव खुर्द, पिंपरी, तळपेवाडी, माळेगाव बुद्रुक, सावळा या गावांमधील ग्रामस्थांची भेट घेऊन शेळके यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रत्येक गावात शेळके यांचे ढोल-ताशांच्या दणदणाटात, मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी सुवासिनींकडून त्यांना औक्षण करण्यात येत होते. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी शेळके यांना गराडा घातला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना शेळके यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

शेळके म्हणाले की, शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले, दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आपण वारंवार विविध माध्यमातून प्रयत्न केले आहे. तालुक्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी व घरी येण्यासाठी गेली तीन वर्षे सुनील शेळके फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक गावातून मोफत वाहनव्यवस्था केली जाते. शालेय शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षण व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधाही तालुक्यात वाढाव्यात यासाठी आपण आग्रही आहोत. अत्याधुनिक काळानुसार भविष्यात डिजिटल शिक्षणावर भर दिला जाईल,

विविध व्यवसाय व उद्योगांना कुशल कामगारांची गरज असते. त्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण वर्ग तसेच कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करून त्याद्वारे तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालत आहोत. मावळ तालुक्यात एमआयडीसी आहेत, पण त्यांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तालुक्यातूनच उपलब्ध होण्यासाठी उद्योगांशी चर्चा करून काही विशेष व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या दौऱ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते काळुराम भोयरकर, सरपंच बळीराम भोयरकर, विशाल पिंगळे, बाळू पारीटे, दत्तोबा मोधळे, प्रशांत काठे, उज्वला थरकुडे, अर्चना थरकुडे, संभाजी कडू, नारायण पारिटे, नारायण मालपोटे, निवृत्ती वाडेकर, बळीराम वाडेकर, सोमनाथ आंद्रे, लक्ष्मण तळावडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.