Chinchwad : पोलीस हवालदार परवीन पठाण यांना नेमबाजी स्पर्धेत रजत पदक

एमपीसी न्यूज – निगडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार परवीन महेबूब पठाण यांनी नेमबाजी स्पर्धेत रजत पदक मिळवले. इंदोर येथे झालेल्या सातव्या पश्चिम विभाग नेमबाजी स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला क्रीडा प्रकारातील दुसरे पदक मिळाले आहे. दोन्ही पदके पोलीस हवालदार परवीन पठाण यांनीच मिळवून दिली आहेत.

परवीन पठाण यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सातवी पश्चिम विभाग नेमबाजी स्पर्धा 17 ते 26 ऑगस्ट या कालावधीत मध्य प्रदेश मधील इंदोर येथे पार पडली. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या महिला पोलीस हवालदार परवीन महेबूब पठाण यांनी सहभाग घेतला. नेमबाजी चॅम्पियनशिप स्मॉल बोर रायफल/पिस्तोल (एनआर) या स्पर्धेतल्या 50 मीटर 22 रायफल प्रोन पोझी या प्रकारात त्यांनी चमकदार कामगिरी केली. स्पर्धेत त्यांनी रजत पदक मिळवले.

क्रीडा प्रकारात वीसपेक्षा अधिक पदकांची कमाई

परवीन महेबूब पठाण यांनी यापूर्वी देखील अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांना आजवर 20 पेक्षा अधिक पदके मिळाली आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला क्रीडा प्रकारामधील दुसरे पदक मिळाले. पठाण यांनीच ही दोन्ही पदके पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळवून दिली आहेत. पठाण यांनी पहिले पदक आयुक्तालय सुरु झाल्यानंतर लगेच ऑगस्ट-सप्टेंबर 2018 मध्ये मिळवून दिले. तर आयुक्तालयाने एक वर्ष पूर्ण करताच ऑगस्ट 2019 मध्ये दुसरे पदक मिळवून दिले.

राष्ट्रीय पातळीवर निवड

परवीन पठाण यांनी मागील दहा वर्षात बारा नेमबाजी स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. आजपर्यंत त्यांना सहा सुवर्णपदक, पाच कांस्यपदक आणि सहा रजतपदके मिळाली आहेत. यावर्षी यांना विभागीय पातळीवर मिळालेल्या यशामुळे त्यांची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. पुढील काही दिवसात भोपाळ येथे या राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.