Kamshet : तिकोनागडावर दुर्गसंवर्धनाच्या श्री गणेशाचे आगमन

एमपीसी न्यूज- गडकोटांना शिवरायांच्या काळातील एैश्वर्य, वैभव व सुबकता प्राप्त व्हावी, दुर्गसंवर्धनास चांगले दिवस येवो, लोकांमध्ये जनजागृती निर्माण होवो या उद्देशाने किल्ले तिकोणागडावर सोमवारी (दि. 2) दुर्गसंवर्धनाच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

कामशेत येथील चंद्रकांत लोळे यांच्यातर्फे शाडु मातीची पर्यावरणपूरक मूर्ती मिळाली. सकाळी सर्व मावळे गडपायथ्याशी पोहचले. “गणपती बाप्पा मोरया” असा गजर करत टाळ मृदंगासह पालखीतुन श्री गणेशाची मिरवणूक गडाच्या दिशेने मार्गस्थ झाली. श्री गणेश वेताळ महाराज, चपेटदान मारूतीराय असे प्रवास करत गडावर मूर्ती दाखल झाली. यावेळी गडावर माऊली मोहोळ, दत्ता मोहोळ, दिगंबर मोहोळ सागर वाळुंज व धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

गणपतीच्या स्वागताकरिता मांडव, रांगोळी, अब्दागिरी आणि झेंड्यानी गडाचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. त्यानंतर विधीवत आरती, करून श्री गणेश गडावर विराजमान झाले. टाळ मृदृंग वाद्यासह झालेले अभंग गायन, अगरबत्ती, धुपाने झालेले मनमोहन वातावरण यामुळे गडावरील वातावरण प्रसन्न झाले होते.

त्यानंतर ग्रामस्थ गुरूदास मोहोळ व मनोहर सुतार यांचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा सर्वांनी लाभ घेतला. गडावरच्या या दुर्गसंवर्धनाच्या श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पालखीची व्यवस्था करणारे विश्वनाथ जावळीकर यांचे आभार मानण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.