Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट

पिंपरी, भोसरी, चिखलीत दुचाकी चोरीच्या घटना

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला असून पिंपरी, भोसरी आणि चिखली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांनी 90 हजार रुपयांच्या तीन दुचाकी चोरून नेल्या.

रितेश चुहडमाळ जैसवानी (वय 29, रा. पिंपरी कॅम्प, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 2) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 27 जून 2019 रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी रितेश यांनी आपली 20 हजार रुपयांची (एमएच 14 / डीझेड 4956) ही दुचाकी घरासमोर लावली होती. 28 जून रोजी ती चोरीस गेली. याबाबत तब्बल दोन महिन्यांनी गुन्हा दाखल झाला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

सारिका प्रकाश तिटके (वय 38, रा. गिरजूबाबा मंदीराच्या मागे, बौद्धनगर, पिंपरी कॅम्प, पुणे) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सारिका यांनी आपली 50 हजार रुपये किमतीची दुचाकी महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

नितीन मारुती कोकरे (वय 29, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि. 1) रात्री साडेदहाच्या सुमारास नितीन यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोरील रस्त्यावर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like