Pimpri: ‘भीमसृष्टी’चे उदघाटन लांबले ! कार्यक्रमाचा मंडप काढला

मंडपाचा खर्च पाण्यात; सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीच्या उद्घाटनाला काही केल्या मुहूर्त मिळत नाही. उद्घाटनाचा कार्यक्रमात तीन वेळा बदल करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते आज (शनिवारी) सकाळी साडेदहा वाजताचा आयोजित कार्यक्रम पुन्हा लांबणीवर टाकण्यात आला असून सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे मंडपावरील खर्च पाण्यात गेला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी उभारण्यात आली आहे. या कामाला अगोदरच विलंब झाला होता. भीमसृष्टी काम संथ गतीने होत असल्याने महापालिका प्रशासनावर जोरदार टीका होत होती. शहरातील सामाजिक संघटना आणि संस्थानी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी लावून धरली होती. त्यांनतर महापालिका प्रशासनाने काम मार्गी लावल्याचा दावा करत अगोदर 6 सप्टेंबर रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. महापालिका प्रशासनाने त्याची निमंत्रण पत्रिका देखील छापली होती.

नंतर त्यामध्ये बदल करत 10 सप्टेंबर रोजी भीमसृष्टीचे उद्घाटन केले जाणार असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुन्हा तिसऱ्यावेळी त्यामध्ये बदल करत आज (शनिवारी) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भीमसृष्टीचे उद्घाटन आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी भीमसृष्टीच्या बाजूला मोठा मांडव टाकण्यात आला होता. विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तथापि, अचानक आजचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मांडव काढण्यात आला आहे. तीनवेळा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केल्याने आता सत्ताधारी कधीचा मुहूर्त काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like