Talegaon Dabhade : वेळेवर कर्जाची परतफेड केल्यामुळे सहकारी संस्थांचा विकास- बबनराव भेगडे

एमपीसी न्यूज- सहकारामध्ये वसुली हा आत्मा आहे. वेळेवर व मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सहकारी संस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. परंपरेनुसार 25 वर्षे शेतकरी सभासदांनी शेती उद्योग, शेतीपुरक उद्योग, पीक कर्ज, पोल्ट्री, शेती अवजारे, ट्रॅक्टर, मळणी यंत्रे इत्यादीसाठी संस्थेच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार कर्जपुरवठा घ्यावा असे आवाहन पुणे पीपल्स को आॅप बँकेचे माजी अध्यक्ष व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी यावेळी केले.

तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या 71 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तळेगाव स्टेशन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.ची सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 8) संस्थेच्या सभागृहात मोठया उत्साहात संपन्न झाली.

भारतीय किसान संघाचे अध्यक्ष व संस्थेचे माजी अध्यक्ष शंकरराव शेलार हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक व ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बबनराव भोंगाडे, संस्थेचे माजी चेअरमन एकनाथ मु-हे, माजी चेअरमन ज्ञानेश्वर मराठे, सदस्य एकनाथ दाभाडे, सोपान मु-हे, माजी चेअरमन उध्दव शेलार, उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड, संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामभाऊ मराठे, मोहन दाभाडे, कविता अंताराम काकडे, सचिव भाऊ फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे यांनी मार्गदर्शन करून यापुढील काळात संस्था चालविणे फार कठीण काम आहे. संस्थेच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या. संस्थेच्या या आर्थिक वर्षात 1 कोटी 27 लाख कर्जवाटप झाले आहे. भाग भांडवल 40 लाख असून खेळते भांडवल रूपये 4 कोटी 75 लाख आहे.

संस्थेची स्वतःची इमारत, गोडाऊन असून त्याच्या भाड्यामधून संस्थेला उत्पन्न मिळते आहे. तालुक्यातील एकमेव सहकारी विशेष कार्यकारी सोसायटी असेल की, स्वतःच्या मालकीची इमारत आहे. संस्थेला यावर्षी आॅडीट “ब वर्ग ” प्राप्त झालेला असून या संस्थेच्या कार्यक्षेत्रात वराळे, नाणोली, माळवाडी, कोटेश्वरवाडी, शेलारवाडी, सोमाटणे व तळेगाव आदी सात गावांचा समावेश आहे. संस्थेची एकूण सभासद संख्या 916 असून त्यापैकी कर्जाचा लाभ 320 सभासदांनी घेतला आहे.

सभेच्या कामकाजासाठी सहभाग घेऊन प्रास्ताविक संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामभाऊ मराठे यांनी केले तर अहवाल वाचन सचिव भाऊ फाटक यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रवीण मु-हे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.