Chikhali : गरोदर महिलेची पेटवून घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज – रुपीनगर येथे महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेली महिला सात महिन्यांची गरोदर होती. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी पावणे दोनच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे घडली.

शीतल किरण ठवाळ (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला तिच्या पतीसह मागील तीन महिन्यांपासून रुपीनगर येथे राहण्यासाठी आली आहे. शीतल यांचे पती मंगळवारी सकाळी कामानिमित्त मुंबईला गेले. दरम्यान, एकच्या सुमारास शीतल यांनी राहत्या घराचा दरवाजा आतून बंद केला आणि पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. काही वेळेनंतर त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणा-या नागरिकांना पावणेदोनच्या सुमारास काहीतरी जळाल्याचा वास आला. त्यानंतर नागरिकांनी खालच्या मजल्यावर येऊन पहिले असता शीतल यांच्या घरातून धूर येत होता. तसेच दरवाजा आतून बंद होता.

नागरिकांनी चिखली पोलिसांना घटनेची माहिती दिली. चिखली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी शीतल या जळालेल्या अवस्थेत दिसल्या. पोलिसांनी गंभीर जखमी अस्वस्थेतील शीतल यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

शीतल जिल्हा परिषदेमध्ये कामाला होत्या. त्या सात महिन्याच्या गरोदर असल्याने रजेवर होत्या. त्यांचे पती काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. ठवाळ यांच्या घरात नातेवाईक महिला बाळंतीण झाल्याने त्यांना शेक देण्यासाठी कोळसा आणि रॉकेल आणले होते. ते रॉकेल अंगावर ओतून घेत शीतल यांनी आत्महत्या केली. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like