BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: शहराध्यक्षपदावरून ‘आरपीआय’मध्ये उफाळला वाद !

शहराध्यक्षपदी सुरेश निकाळजे यांची नियुक्ती; परस्पर नियुक्ती केल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) यांना सुटण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आरपीआय’मधील पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. पक्षाचे सचिव बाळासाहेब भागवत यांनी सुरेश निकाळजे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर, भागवत यांना शहराध्यक्ष नेमण्याचा अधिकार नसून या नियुक्तीला सर्वांचा विरोध असल्याचे पक्षाच्या दुसऱ्या सचिव चंद्रकांता सोनकांबळे यांनी सांगितले.

आरपीआयचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज पिंपरी दौऱ्यावर आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारलेल्या भीमसृष्टीचे दुपारी तीन वाजता आठवले यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आठवले शहराच्या दौऱ्यावर असतानाच पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी सुधाकर वारभुवन कार्यरत होते. पक्षाचे सचिव बाळासाहेब भागवत यांनी वारभवन यांच्या जागी सुरेश निकाळजे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र देखील दिले आहे. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार निकाळजे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांना मोठ्या संख्येने पक्षामध्ये सहभागी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

याबाबत बोलताना आरपीआयच्या सचिव चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, ” सुधाकर वारभुवन हेच शहराध्यक्ष आहेत. त्यांना काढण्याचा अधिकार केवळ रामदास आठवले यांना आहे. बाळासाहेब भागवत यांना नवीन शहराध्यक्ष नियुक्त करण्याचा अधिकार नाही. ते तिसऱ्या क्रमांकाचे सचिव आहेत. मी देखील सचिव आहे. सुरेश निकाळजे यांना सर्वांचा विरोध आहे. त्यांची परस्पर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत कोणालाच माहिती नाही. नवीन शहराध्यक्ष नेमण्याचा अधिकार आठवले साहेबांनाच आहे” असे सोनकांबळे म्हणाल्या.

HB_POST_END_FTR-A2

.