Nigdi : सार्वजनिक मंडळांनी घ्यावा अष्टविनायक मित्र मंडळाचा आदर्श(व्हिडीओ)

एमपीसी न्यूज- गणेश विसर्जनाच्या दिवशी होणारे जलप्रदूषण, बाप्पांच्या मूर्तीची होणारी विटंबना हे सर्व टाळायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन घरातच केले पाहिजे हा विचार आता बळ धरू लागला आहे. अनेक भाविक घरच्या बाप्पांचे विसर्जन घरातच एका बादलीमध्ये, घंगाळात करू लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील ही प्रथा बदलून मंडळाच्या ठिकाणीच मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे असा विचार समोर येत आहे.  त्या दृष्टीने यापूर्वीच पाऊल उचलत निगडीच्या यमुनानगर भागातील अष्टविनायक मित्र मंडळाने सर्व गणेश मंडळासमोर एक आदर्श ठेवला आहे.

अष्टविनायक मित्र मंडळाची स्थापना 1984 साली करण्यात आली. सात दिवसाच्या गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. यमुनानगर येथील अष्टविनायक मंदिराच्या आवारात पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून बनवलेल्या श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना दरवर्षी केली जाते. सातव्या दिवशी मोठी मिरवणूक काढून मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन नदीच्या पाण्यात केले जात असे. साधारणपणे चार ते पाच वर्षे ही प्रथा चालत आली. त्यानंतर मात्र गणेशमूर्तीचे विसर्जन मंदिराच्या आवारातच एका ड्रममध्ये करण्याचा निर्णय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्वानुमते घेतला.

याबाबत माहिती देताना मंडळाचे कार्यकर्ते जगदीश साबळे म्हणाले, ” मंडळाची स्थापना झाल्यानंतर चार ते पाच वर्षे आम्ही मिरवणूक काढून बाप्पांचे विसर्जन नदीच्या पाण्यात करीत होतो. परंतु, त्याठिकाणी अनेकदा नदीच्या खोल पाण्यात विसर्जन न करता नदीच्या किनाऱ्यालगतच गणेश मूर्तींचे विसर्जन केले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नदी किनाऱ्यावर बाप्पांच्या मूर्तीची विटंबना झालेली पाहायला मिळते. म्हणूनच मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्वानुमते आपल्या बाप्पांचे विसर्जन गणेश मंदिराच्या आवारातच करायचा निर्णय घेतला. त्यामुळे आता यमुनानगर भागातून विसर्जन मिरवणूक काढून पुन्हा अष्टविनायक मंदिरात तिचा समारोप केला जातो. त्याठिकाणी एका मोठ्या ड्रममध्ये मोठ्या श्रद्धेने गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते”

अन्य सार्वजनिक मंडळांनी देखील आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन नदीच्या पाण्यात किंवा महापालिकेने बांधलेल्या हौदामध्ये न करता उत्सवाच्या ठिकाणीच केले पाहिजे, जेणेकरून जलप्रदूषण होणार नाही आणि बाप्पांच्या मूर्तीची विटंबना थांबेल. असे आवाहन साबळे यांनी केले. अष्टविनायक मित्र मंडळातर्फे गणेशजन्म उत्सव, दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. गुढीपाडव्याला भारतीय संस्कृती मंचाच्या सहयोगाने प्रभातफेरी काढून हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते. त्याशिवाय आरोग्य शिबिर, रक्ततपासणी शिबिर अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे या मंडळामध्ये कुणीही पदाधिकारी नाही. प्रत्येकजण आपापली जबाबदारी ओळखून या उत्सवाची तयारी करीत असतो. स्वप्नील परदेशी, गिरीश देशमुख, आदित्य चौधरी, अमोल म्हस्के, वसीम खान, राजेश साठे असे सर्वच कार्यकर्ते जोमाने काम करतात अशी माहिती जगदीश साबळे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.