Talegaon Dabhade: ‘ब्रिजवासी मिठाईवाले’च्या ढोकळा चटणीत आढळले मेलेले झुरळ !

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ‘ब्रिजवासी मिठाईवाले’ या नामांकित दुकानातून खरेदी केलेल्या ढोकळा-चटणीत मेलेले झुरळ आढळून आल्याने संपूर्ण शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे. या प्रकरणी एका ग्राहकाकडून नगरपरिषदेला लेखी तक्रार व फोटो प्राप्त झाले असून या प्रकरणी तपासणी करून संबंधित दुुकानावर कारवाई करण्याबाबत मु्ख्याधिकारी यांनी अन्न-औषध प्रशासनाला पत्र पाठविले आहे.

विजय यशवंत कदम (रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. कदम यांनी काल (मंगळवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास ब्रिजवासी मिठाईवाले या दुकानातून ढोकळा-चटणी खरेदी केली. त्यात मेलेले झुरळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ती बाब तातडीने दुकानमालकाच्या निदर्शनास आणून दिली. दुकानदाराने चूक मान्य करून पुन्हा असा प्रकार होणार नाही, याची काळजी घेऊ, अशी सारवासारव करत झाल्या प्रकारबाबत दिलगिरी व्यक्त केली.

ब्रिजवासी मिठाईवाले दुकानातून दोन दिवसांपूर्वीच खरेदी केलेल्या खव्यामध्येही मेलेले झुरळ आढळून आले होते. त्याबाबत जाब विचारला असता दुकानमालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. काही महिन्यापूर्वी याच परिसरातील एका बेकरीत असा प्रकार घडला होता. तेव्हा नगरपरिषद प्रशासनाने तत्परता दाखवून कारवाई केली होती. तो प्रकार ताजा असतानाच पुन्हा तळेगावकर नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा संतापजनक प्रकार दुकानदारांकडून वारंवार घडत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित दुकानादारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी निवेदनात केली आहे.

या प्रकाराचे फोटो, व्हिडिओ आणि पोस्ट काल रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण तळेगाव शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे. या प्रकाराबाबत ब्रिजवासी मिठाईवाले दुकानाच्या मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तथापि संपर्क होऊ न शकल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

दरम्यान, नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणी अन्न-औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांना पत्र पाठविले आहे. तळेगाव दाभाडे शहरातील सर्व खाद्य पदार्थ बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्या बेकर्स अँड स्वीट होम, हॉटेल्स, खानावळी व तत्सम आस्थापना असून त्याद्वारे या संस्था नागरिकांना सेवा देत आहेत. ब्रिजवासी मिठाईवाले दुकानातून खरेदी केलेल्या ढोकळा-चटणीत मेेलेले झुरळ आढळल्याची लेखी तक्रार एका नागरिकाकडून नगरपरिषदेस प्राप्त झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर असून अन्न-औषध प्रशासन विभागाने त्यांच्या स्तरावर सर्व संबंधित आस्थापनांची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती मुख्याधिकारी यांनी पत्रात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like