Pimpri : शिल्पचित्रातून उलगडले डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांवर आधारित 19 शिल्पचित्र उभारण्यात आली आहेत. या शिल्पचित्रांमधून डॉ. बाबासाहेब यांचा संपूर्ण जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. या शिल्पचित्रांविषयी –

1) बालपण व शिक्षण

भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी लष्करी कॅम्पमध्ये झाला. आई भिमाई त्यांना भिवा म्हणत असत. सेवानिवृत्तीनंतर इसवी सन 1894 मध्ये रामजी कुटुंबासह कोकणातील कॅम्प दापोली परिसरात राहण्यास आले. पुढे रामजी सातार्‍याला राहण्यास गेले. येथे नोव्हेंबर 1896 मध्ये बाल भिवाला कॅम्प स्कुल सातारा शाळेत घातले. नंतर साताऱ्याच्या गव्हर्नमेंट अॅग्रीकल्चर हायस्कूलमध्ये इंग्रजी पहिलीत 7 नोव्हेंबर 1930 रोजी घातले. तेथे 1904 पर्यंत शिकले. पुढे रामजी कामानिमित्त मुंबईत आले. तेथे परळ भागातील डबक चाळीत वास्तव्य करू लागले. सुरुवातीला 1904 मध्ये भिवाला मराठा हायस्कूल मध्ये घातले. परंतु या शाळेचा दर्जा चांगला नसल्याने त्यातून भिवाचे नाव कमी करून सरकारी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये घातले. 1907 मध्ये भीमराव मॅट्रिक पास झाले. मुंबईला येण्याअगोदर रामजी गोरेगाव येथे कामाला होते. त्यांना भेटण्यासाठी भीमराव, त्यांचे भाऊ व बहिणीच्या मुली हे सर्व साता-यावरून रेल्वेने मसूर पर्यंत गेले. तेथून पुढे बैलगाडीने प्रवास केला. बैलगाडी मालकाने त्यांना अस्पृश्यांची मुले म्हणून त्रास दिला.

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कुटुंबीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशातील उच्च शिक्षण घेऊन मायभूमीत परतल्यानंतर त्यांनी समाजपरिवर्तनाच्या लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिले. आपल्या कुटुंबीयांकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. हा त्यांचा कुटुंबवत्सलपणा त्यांच्या या छायाचित्रातून प्रतिबिंबित होतो. डावीकडून बसलेले बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव यशवंत, स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती पत्नी रमाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे बंधू आनंदराव यांच्या पत्नी लक्ष्मीबाई व त्यांची लहान मुलगी, बंधू आनंदराव आंबेडकर यांचे पुत्र मुकुंदराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवडता कुत्रा टॉबी

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1920 मध्ये ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ या संस्थेची स्थापना करून आपल्या सामाजिक चळवळीला प्रारंभ केला. त्यास गती येण्यासाठी म्हणून ‘मूकनायक’ या वृत्तपत्राची निर्मिती करून समाजप्रबोधनासाठी चालना दिली. मार्च 1927 मध्ये ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्राची निर्मिती करून आंदोलनाची व्यापकता वाढवली. नोव्हेंबर 1930 मध्ये ‘जनता’ हे वृत्तपत्र काढून त्या वेळच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्याची चळवळ अधिक गतिमान केली. ज्या समाजाला वाचा असून बोलता येत नाही त्याच शोषित, पीडित आणि वंचित समाजाच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांचे नायकत्व स्वीकारणारे मूकनायक आणि ज्या समाजाला बहिष्कृत केले, त्या बहिष्कृत भारताचे प्रश्न मांडण्यासाठी बहिष्कृत भारत आणि सर्व जनतेसाठी जनता ही वृत्तपत्रे डॉ आंबेडकर यांनी सुरू केली. भारतीय जनता बुद्धमय करण्यासाठी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जनता वृत्तपत्राचे रूपांतर ‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकामध्ये करण्यात आले.

4) माणगाव परिषद

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाची एम ए, पी एचडी ही पदवी संपादन करून मायदेशी परतले होते. भारतातील अस्पृश्य समाजातील एका व्यक्तीने एवढे मोठे उच्च शिक्षण घेतलेले आहे. हे जेव्हा कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांना समजले, तेव्हा ते स्वतः त्यांना भेटावयास त्यांच्या मुंबई येथील डबक चाळीतील राहत्या घरी गेले. या उच्चशिक्षित व्यक्तीचा उचित सत्कार झाला पाहिजे, या समाजाला त्यांची ओळख झाली पाहिजे. या उदात्त भावनेने आणि बहुउद्देशीय कोल्हापूर जवळील माणगाव परिषदेमध्ये 22 मार्च 1922 रोजी परिषदेचे अध्यक्ष या नात्याने शाहू महाराजांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘डॉ. आंबेडकर हे तुमचे खरे पुढारी आहेत. ते तुमचेच नव्हे तर तुम्हा-आम्हा सर्वांचा उद्धार करतील.’ असे गौरवोद्गार शाहू महाराजांनी काढले.

5) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे परदेशातील शिक्षण

भीमराव रामजी आंबेडकर यांनी बीए ही पदवी जानेवारी 1913 मध्ये प्राप्त केल्यानंतर त्यांनी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेकडे प्रयाण केले. कोलंबिया विद्यापीठात ‘ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी’ या विषयावर प्रबंध सादर करून जून 1915 मध्ये ही पदवी प्राप्त केली. ‘भारताचे राष्ट्रीय किफायत एक ऐतिहासिक व पृथक्‍करणात्मक अभ्यास’ या विषयावरील प्रबंध पी.एचडी.च्या पदवीसाठी विद्यापीठास जून 1916 मध्ये सादर केला. हा प्रबंध पुस्तक रुपाने विद्यापीठाला सादर केल्यानंतर जून 1927 मध्ये त्यांना रीतसर पीएचडी ही पदवी बहाल करण्यात आली. लंडनमधील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेची एम एससी ही पदवी जून 1921 मध्ये त्यांनी मिळवली. ‘रुपयाचा प्रश्न’ या विषयावर प्रबंध सादर करून डी एससी ही पदवी नोव्हेंबर 1923 मध्ये प्राप्त केली. डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत. त्यांनी हा आठ वर्षांचा अभ्यासक्रम दोन वर्षात पूर्ण केला. बॅरिस्टर ही पदवी लंडनमधील ‘ग्रेजइन’ या संस्थेकडून सन 1923 मध्येच मिळविली. विदेशातील शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे नरेश सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी अर्थसहाय्य केले.

6) मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा जनतेला दिलेला महान असा संदेश कार्यान्वित करण्यासाठी 1920 पासून सामाजिक चळवळींच्या माध्यमातून वसतिगृहांची निर्मिती केली. जुलै 1945 मध्ये ‘जनता शिक्षण’ संस्थेची स्थापना करून मुंबई येथे जून 1946 मध्ये ‘सिद्धार्थ महाविद्यालय’ सुरू केले. औरंगाबाद येथे जून 1950 मध्ये सुरू केलेल्या महाविद्यालयाचे नामकरण ऑक्टोबर 1955 मध्ये ‘मिलिंद महाविद्यालय’ असे करण्यात आले. या महाविद्यालयाच्या लगतच्या परिसराचे नामकरण ‘नागसेन वन’ असे करण्यात आले. मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असतानाच या प्रसंगाचे हे उठाव शिल्प आहे. यामध्ये डावीकडून प्राचार्य एम बी चिटणीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर व त्यांच्या शेजारी के बोले दिसत आहेत.

7) गोलमेज परिषद

पहिली गोलमेज परिषद – भरताला द्यावयाच्या राजकीय अधिकाराबाबत सर्वांसमक्ष चर्चा करावी म्हणून लंडनमध्ये गोलमेज परिषद भरविण्यात आली. पहिली परिषद 12 नोव्हेंबर 1930 ते 19 जानेवारी 1931 दरम्यान झाली. अस्पृष्याचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली होती. या परिषदेमध्ये ‘अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी’, ‘अस्पृश्यांची लष्करात भरती’ या दोन मुद्द्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात जोर दिला. एवढ्यावरच न थांबता या विषयांवर खलिते लिहून ते छापून सर्व सभासदांना वाटले.

दुसरी गोलमेज परिषद – 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 19 31 या दरम्यान झाली. अस्पृश्यांचे प्रतिनिधी कोण? ‘गांधी की आंबेडकर’ हा वाद या ठिकाणी उपस्थित झाला. भारतातून हजारो अस्पृश्यांनी डॉ. आंबेडकर हेच आमचे प्रतिनिधी असल्याच्या तारा लंडनला पाठवल्या. अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अधिकार गांधींनी या ठिकाणी नाकारले. मुस्लिम प्रतिनिधींनीही ते नाकारावेत त्यासाठी गांधींनी राजकीय डावपेच केले. डॉ. आंबेडकरांनी हे सर्व डावपेच हाणून पाडले.

तिसरी गोलमेज परिषद – ही परिषद 13 जून 1933 ते 1 सप्टेंबर 1933 पर्यंत चालली. ही परिषद म्हणजे संयुक्त समितीची बैठक होय. यामध्ये भारतीय सभासदांनी इंग्रज अधिकार्‍यांची उलट तपासणी घेतली. यामध्ये सर्वात महत्त्वाचे अभ्यासपूर्ण व मूलभूत प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांनी विचारले. इंग्रज अधिकारी भारतात कसा कारभार परत होते? यावर बाबासाहेबांचे किती बारीक लक्ष होते, हे स्पष्ट होते. यातून त्यांची विद्वत्ता आणि राष्ट्रप्रेम प्रखरपणे दिसून येते.

8) पुणे करार

पुणे करार हा अस्पृश्यांच्या राखीव जागेसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये झालेला करार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या मेहनतीने गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मिळविले होते. त्यानुसार अस्पृश्यांना स्पृश्य व अस्पृश्य अशा दोन्ही उमेदवारांना मते देण्याची संधी होती. ती संधी यापुढे कराराने संपुष्टात आली.

दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जातीय निवाड्याला गांधीजींनी विरोध केला होता. या विरोधात आपण आंदोलन करू, अशी घोषणाही केली होती. म्हणून त्यांना भारतात येताच येरवडा जेलमध्ये ठेवले गेले होते. हा निवाडा झाल्यावर 20 सप्टेंबर 1932 मध्ये महात्मा गांधी आमरण उपोषणाला बसले. उपोषणाची वेळ येऊ नये म्हणून पूर्वीपासून काँग्रेसचे नेते प्रयत्नात होते. त्या वेळी झालेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ‘तुम्ही मला शेजारच्या म्युनिसिपालिटीच्या दिव्याच्या खांबावर जरी फाशी दिले तरी चालेल पण मी केवळ गांधीजींचे प्राण वाचविण्यासाठी अस्पृश्यांच्या राजकीय हितांना तिलांजली देणार नाही.

दरम्यानच्या काळामध्ये देशभरातून त्यांच्यावर दबाव वाढत राहिला. तेव्हा बाबासाहेबांनी पर्यायी दहा मागण्या पुढे केल्या. यामध्ये राखीव जागा, प्रौढ मतदान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, शिक्षणासाठी आर्थिक तरतूद, अन्यायाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा अशा गोष्टींचा समावेश होता. शेवटी वाटाघाटीत 23 सप्टेंबर 1932 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराचा खर्डा गांधीजींच्या समोर ठेवला. या प्रसंगाचे हे उठाव शिल्प आहे.

9) भारताचे संविधान अर्पण सोहळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सलग दोन वर्ष 11 महिने 17 दिवसात भारताची राज्यघटना पूर्ण करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्त केली. याप्रसंगी घटना समितीचे सदस्य टी टी कृष्णम्माचारी आपल्या भाषणात म्हणतात, “घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. एक सभासद मृत्यू पावला, एक सभासद अमेरिकेला गेला, एक सभासद संस्थानिकांच्या कामात गुंतला होता, एक दोन सभासद दिल्लीपासून दूर राहत त्यांची प्रकृती बिघडल्याने तेही उपस्थित राहू शकले नाहीत, शेवटी घटना तयार करण्याचा भार एकट्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर पडला.”

10) नागपूर येथील दीक्षाभूमी विधी समारंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर समाजाने केलेल्या सत्कार समारंभात कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी स्वतः लिहिलेले गौतम बुद्ध चरित्र भीमरावांना भेट म्हणून दिले. तेव्हापासून बुद्ध विचारांचा प्रभाव त्यांच्यावर सतत राहिला. बुद्ध विचार समजून घेण्यासाठी त्यांनी जगभरातील बुद्धा वरील ग्रंथांचा, स्थळांचा सखोल अभ्यास केला. स्वतः त्यांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाची निर्मिती केली.

भगवान बुद्धांच्या विचार प्रणालीने बुद्धमय झालेल्या बाबासाहेबांनी पत्नी डॉ. सवितासह 14 ऑक्टोबर 1956 रोजी भन्ते चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर बाबासाहेबांनी स्वतः उपस्थित लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि स्वतः तयार केलेल्या 22 प्रतिज्ञा त्यांच्याकडून वदवून घेतल्या. एकाच वेळी लाखो अनुयायांना धम्माची दीक्षा देण्याचा ऐतिहासिक समारंभ जगात या अगोदर आणि आजतागायत या भुतलावर घडला नाही.

11) महाड सत्याग्रह

4 ऑगस्ट 1923 रोजी मुंबई इलाखा कौन्सिलमध्ये रावबहाद्दूर सीताराम केशव बोले यांनी ठराव मांडला की, ‘अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, विद्यालय, न्यायालय अशा सार्वजनिक ठिकाणी मुक्त प्रवेश असावा. हा ठराव कृतीत आणण्यासाठी सरकारने एक परिपत्रक काढले. त्यानुसार महाड नगरपालिकेनेही असाच ठराव पास केला. परंतु या ठरावाची अंमलबजावणी होत नव्हती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे 19 व 20 मार्च 1927 रोजी ‘कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद अधिवेशन-पहिले’ भरविण्यात आले. 19 मार्च रोजी अधिवेशनात विषय नियामक समितीत महाड नगरपालिकेने आपल्या मालकीचे तळे सर्वांसाठी खुले असल्याचा जो ठराव पास केला होता त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असा ठराव पास करण्यात आला. दुसऱ्या दिवशी 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण चवदार तळ्यावर जाऊन पाणी प्याले. स्पृश्य हिंदूंनी हे तळे वीटाळलेले आहे, या भावनेतून तळ्यामध्ये विधीपूर्वक गोमूत्र टाकले. माणसाच्या स्पर्शाने पाणी विटाळते. आणि गोमुत्राने शुद्ध होते. या अवैज्ञानिक दृष्टिकोनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राग आला व त्यांनी पुन्हा 25 डिसेंबर 1927 रोजी महाड सत्याग्रह केला आणि मनुस्मृतीचे दहन केले. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही केस लढवून मार्च 1937 मध्ये विजय मिळवला.

12) नाशिकचा सत्याग्रह

3 मार्च 1990 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला नाशिक शहरामध्ये सुरुवात झाली. या अगोदर पाच महिने मंदिर पंचांना मंदिर प्रवेशासाठी रीतसर विनंतीपत्र पाठवलेली होती. तेव्हा स्पृश्य व अस्पृश्य मंडळींमध्ये समझोता झाला की, रामाचा रथ दोघांनी ओढायचा. परंतु स्पृश्य मंडळींनी ऐनवेळी ठरलेल्या वेळेच्या आधी रथ ओढला व अस्पृश्यांची फसवणूक केली. त्यामुळे तेथे दंगा उद्भवला. अशा दंगलीचे प्रमाण पुढे वाढत गेले. सत्याग्रहाच्या दरम्यान बाबासाहेब विदेशात असल्यामुळे पत्राद्वारे ते सत्याग्रहींना मार्गदर्शन करीत. 3 मार्च 1934 च्या आपल्या पत्रात बाबासाहेब खंबीर सरदार भाऊराव गायकवाड यांना सत्याग्रह तहकूब करण्यास सांगताना म्हणतात की, ‘हिंदू समाजाचा अविभाज्य एकात्म भाग बनण्यापूर्वी हिंदू धर्मशास्त्र व हिंदू समाज यांची संपूर्णतः पुनर्रचना करण्याचा अस्पृश्य समाजाने आग्रह धरावा असा सल्ला त्यांना द्यावासा वाटतो. अस्पृश्यांना आपल्या हक्काबद्दल जागृत करणे व त्यांच्यात जोम निर्माण करणे हाच सत्याग्रह सुरु करण्यामागे हेतू होता.’

13) वेरूळ अजिंठा लेण्यास भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाचा कोनशिला बसविण्याचा समारंभ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 1951 रोजी संपन्न झाला. दरम्यान, बाबासाहेब आंबेडकर हे राजेंद्र प्रसाद यांना प्राचीन अजिंठा वेरूळ लेण्या पाहण्यासाठी घेऊन गेले. त्या प्रसंगाचे हे उठाव शिल्प आहे.

तथागत भगवान बुद्धाच्या विचारांनी संपूर्ण भारत प्रभावित झाला होता. त्याच्या असंख्य खुणा भारतभर असलेल्या बौद्ध लेण्यांमधून दिसून येतात. या लेण्यांमधून बौद्ध आचार, तत्त्वज्ञान, संस्कृती व त्या काळातील विलोभनीय अशा स्थापत्यकला आणि शिल्पकला यांचे दर्शन घडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच बुद्ध विचारांनी प्रभावित झाले होते. म्हणूनच राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना त्यांनी अजिंठा-वेरूळ या प्राचीन लेण्यांचे दर्शन घडवले.

14) तीन महापुरुषांची भेट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरू मानतात. भाऊराव पाटील हे सुद्धा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतील एक सदस्य आहेत. सत्यशोधकी जलशांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. यातूनच शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार सुरू केला. 1928 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सातार्‍यातील छत्रपती शाहू महाराज वस्तीगृहाला भेट दिली असता इतर फराळ नाकारून त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या बरोबर भाजी भाकरी खाल्ली.

1955 मध्ये बाबासाहेब साताऱ्याला आले असता कर्मवीर भाऊराव त्यांना स्वतःहून भेटावयास गेले. आपण माता भिमाईच्या स्मरणार्थ भीमाबाई आंबेडकर हायस्कूल सुरू करणार आहोत, असे सांगितले व साताऱ्यात ते सुरूही केले. बाबासाहेबांनी कर्मवीरांच्या वस्तीगृहात पुन्हा एकदा भेट देऊन वस्तीगृहास देणगी दिली. या वसतीगृहाच्या शेरा वहीच्या अभिप्रायात ‘ही एकमेव अशी संस्था आहे की, राष्ट्र कल्याणाची काळजी वाहणाऱ्या प्रत्येक माणसाने तिच्या उत्कर्षासाठी हातभार लावला पाहिजे’ असे लिहिले.

संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे गोरगरीब मुलांसाठी चोखामेळा वसतिगृह सुरु केले होते. या वसतिगृहाचे प्रमुख विश्वस्त म्हणून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केली होती. जुलै 1949 मध्ये वस्तीगृहाची सर्व सूत्रे कायदेशीरपणे त्यांनी एक बाबासाहेबांकडे सोपवली. संत गाडगेबाबांची बाबासाहेबांवर फार श्रद्धा होती. म्हणूनच 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर या धक्क्याने गाडगेबाबा पूर्ण हादरून गेले व त्यांनी 20 डिसेंबर 1956 रोजी आपला देह त्यागला.

15) विधी मंत्रीपदाची शपथ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समिती मधील घटना शास्त्रावरील भाषणे, मांडलेले विचार, राष्ट्रहिताच्या अंगाने त्यांनी केलेले कार्य पाहून काँग्रेस सहित सर्वांना असे वाटत होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात आले पाहिजेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्र उद्धारासाठी करून घेतला पाहिजे. डॉ. आंबेडकर यांनी सुद्धा मागील मतभेद विसरुन या प्रस्तावाला होकार दिला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात विधी मंत्रीपदाची शपथ 3 ऑगस्ट 1947 रोजी दिली. त्या क्षणाचे हे उठाव शिल्प आहे.

16) देहूरोड बुद्धविहार

देहूरोड पुणे येथे 25 डिसेंबर 1954 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. बुद्ध काळाच्या प्रभावाने नंतर सुमारे बाराशे वर्षानंतर पुन्हा एकदा भारतभूमीत बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेले देहूरोड येथील हे बुद्ध विहार अद्वितीय ठरलेले आहे.
डॉ. बाबासाहेबांना डोळे बंद करून एकाच ठिकाणी बसलेले तथागत बुद्ध अभिप्रेत नव्हते. त्यासंबंधी ते म्हणतात, ‘तथागत बुद्ध देशाच्या कानाकोपऱ्यात अखंडपणे डोळे उघडे ठेवून आयुष्यभर फिरत राहिले, जगाचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि त्यांचे हे भ्रमण पायी चालत असे. त्यांनी कधीही वाहन अथवा साधन प्रवासासाठी वापरले नाही. डॉ. बाबासाहेबांना डोळे उघडे असलेले तथागत बुद्ध अपेक्षित होते. रंगून येथे अशीच डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांना मिळाली. त्याच मूर्तीची देहूरोडच्या विहारात स्थापना करण्यात आलेली आहे. त्या क्षणाचे हे उठाव शिल्प आहे. त्यावेळी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ही ऐतिहासिक घटना फार महत्त्वाची असून या घटनेची नोंद इतिहासात होईल आणि या लहान बुद्ध मंदिरापासून धम्मक्रांतीला सुरुवात होईल’ असे उद्गार काढले.

17) भिवा ते बोधिसत्व

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचे ढोबळमानाने पाच टप्पे दाखवता येतात. भिवा, भीमराव, डॉ. आंबेडकर, बाबासाहेब, बोधिसत्त्व. भिवा हा लहानपणी खोडकर, खेळकर, हट्टी वृत्तीचा होता. दापोली, सातारा व मुंबई येथील चांगले-वाईट अनुभव त्याला मिळाले. भीमरावाला परिश्रमपूर्वक शिक्षण घ्यावे लागले. वडिलांनंतर त्यांना घराची जबाबदारी स्वीकारावी लागली. बडोद्याला नोकरीवर असताना जातीयतेच्या राक्षसाची प्रखरतेने जाणीव झाली. यातून बाहेर पडण्याचा व समाजाला बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे ज्योतिबा फुले यांनी सांगितलेला शिक्षणाचा मार्ग होय, याची जाणीव त्यांना झाल्यानंतर ते ज्ञानाच्या लालसेपोटी परदेशात शिक्षण घेण्यास गेले. डॉ. आंबेडकर हे व्यक्तिमत्त्व यातूनच साकारले. शोषित समाजाला गुलामगिरी, विषमतेची जाणीव करून देण्याचे काम हे व्यक्तिमत्व करते. भारतातील स्त्री, कामगार, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी व बहुसंख्य मागास वर्गाचे नेतृत्व करत बाबासाहेब हे व्यक्तिमत्व यातून पुढे आलेले दिसते. फक्त भारतातूनच नव्हे तर जगातून दुःख नष्ट झाले पाहिजे. प्रत्येक मनुष्य सुखी झाला पाहिजे, म्हणून जगाला बुद्धाकडे घेऊन जाता जाता बाबासाहेब बोधिसत्व झाले.

18) बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण

भारतीय घटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 26 अलिगड रोड, दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. दिल्लीवरून त्यांचे पार्थिव विमानाने काही वेळेसाठी नागपूर येथे आणले. नागपूर येथील लाखो जनतेने त्यांचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांचे निवासस्थान ‘राजगृह’ येथे आणण्यात आले.
7 डिसेंबर 1956 रोजी त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या निवासस्थानापासून दादर चौपाटीपर्यंत नेण्यात आली. अंत्ययात्रेला देशभरातून लाखोंच्या संख्येने शोकाकुल जनसागर लोटला होता. दादर चौपाटीवर त्यांच्या पार्थिव शरीराला अग्नी देण्यात आला. याच ठिकाणी त्यांच्या चितेला साक्ष म्हणून लाखो लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 9 डिसेंबर 1956 रोजी दादर चौपाटीवर जाहीर शोकसभा घेण्यात आली.

19) भारतरत्न प्रदान

आधुनिक भारताचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक घटनाकार, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, कृषीतज्ञ, कायदेपंडित, संसदपटू, विचारवंत, इतिहासकार, संशोधक, मानववंशशास्त्रज्ञ, भाषातज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ, निर्भीड पत्रकार, साहित्यरसिक, लढवय्या योद्धा, उत्तम वक्ता, क्रांतिकारक, धर्मतत्त्वचिंतक, बुद्धनीतीतज्ञ, धम्माचे मांडणीकार, स्वह्रदय माणूस होते. त्यांनी सर्व स्तरातील उपेक्षित, वंचित समूहासाठी आपले आयुष्य पणाला लावले. शेतकरी, कामगार, मजूर, स्त्रिया, दलित, अल्पसंख्यांक, समाजामध्ये त्यांनी आपल्या कार्याने क्रांतिकारक बदल घडवून आणले. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, अशा क्रांतिकारक विचारांनी त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय ही तत्त्वे समाजमनात रुजविण्याचा प्रयत्न केला. या जीवन मूल्यांमध्येच मानवी जीवनाची सफलता आहे, याचे महत्व लक्षात आणून दिले व यासाठी प्रसंगी स्वकियांशी लढण्याचे बळही दिले. त्यांच्या या कार्याचा साक्षात्कार सर्व भारतीयांना झाल्यानंतर 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने भूषविण्यात आले. त्यांच्या पत्नी डाॅ. सविता भीमराव आंबेडकर हा पुरस्कार स्वीकारतानाचे हे उठावशिल्प.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.