Talegaon Dabhade : तळेगाव नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी गणेश खांडगे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी जनसेवा विकास समितीचे नगरसेवक गणेश वसंतराव खांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनसेवा विकास समितीच्या हेमलता खळदे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेत भाजपा, जनसेवा विकास समिती, आरपीआय (आठवले गट) महायुतीची सत्ता आहे.

जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या तथा माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी गणेश खांडगे यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड होण्याबाबत नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याकडे शिफारस करून तसे लेखी पत्र दिले. नगराध्यक्षा जगनाडे यांनी गणेश खांडगे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र दिले आहे. मुख्याधिकारी सचिन पवार, गटनेत्या सुलोचना आवारे, नगराध्यक्षा जगनाडे यांनी खांडगे यांना शुभेच्छा दिल्या.

गणेश खांडगे हे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष असून उत्कृष्ट संघटक म्हणून ते ओळखले जातात. खांडगे हे मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था आणि मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल या सहकार व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक असून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव जनरल हाॅस्पिटल तळेगाव दाभाडे, इंद्रायणी औद्योगिक वसाहत टाकवे मावळ आदी संस्थेच्या कारभाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी यापूर्वी पदभार सांभाळला आहे. त्याशिवाय महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे ते माजी संचालक असून तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक, आरोग्य आदी क्षेत्रात त्यांचा वावर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like