Pimpri : शहरात ‘बीआरटी’चे 45 किलोमीटरचे जाळे

आयटीपार्क, एमआयडीसी आणि तीर्थक्षेत्राला जोडणारा काळेवाडी फाटा ते देहूआळंदी बीआरटी सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात जलद गती वाहतूक (बीआरटी)चे 45 किलोमीटरचे जाळे पूर्ण झाले आहे. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हे सव्वा दहा किलोमीटरचे अंतर जोडणारा बीआरटीएस मार्ग देखील नुकताच सुरु करण्यात आला आहे. आयटीपार्क, एमआयडीसी आणि तीर्थक्षेत्राला जोडणारा शहरातील हा महत्वाचा मार्ग आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना जलगतीने प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी ‘बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम’ अर्थात बीआरटीएस मार्ग शहरात उभारण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 45 किलोमीटरचे जाळे पूर्ण झाले असून दोन मार्ग प्रस्तावित आहेत.

काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हा 10.250 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. तर, 45 मीटर रुंद आहे. या मार्गाचे पाच टप्प्यात विभाजन करून काम पूर्ण करण्यात आले आहे. 2011 पासून या मार्गाचे काम सुरु होते. कारखान्यांची खडखड आणि देहू, आळंदी तीर्थक्षेत्राची अनुभूती देणाऱ्या या मार्गासाठी 316 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. हा मार्ग नुकताच सुरु करण्यात आला आहे.

या नवीन मार्गाचा फायदा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना होणार असून, रोज सुमारे एक लाख प्रवासी या बससेवेचा वापर करतील, असा अंदाज आहे. या बीआरटीएस मार्गावर एकूण 17 बस थांबे असणार असून या नवीन मार्गावर दहा ई-बस धावणार आहेत. या नवीन मार्गाचा फायदा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना होणार असून, रोज सुमारे एक लाख प्रवासी या बससेवेचा वापर करतील, असा अंदाज आहे.

याबाबत बोलताना बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजने म्हणाले, ”शहरात बीआरटीचे 45 किलोमीटरचे जाळे पूर्ण झाले आहे. सार्वजनिक वाहतुकीकरिता समर्पित हे मार्ग आहेत. सर्व मार्गावर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर मेट्रोचे काम चालू असले. तरी, प्रवासी संख्येत घट झाली नाही. नाशिक फाटा ते वाकड रस्ता या 8 किलोमीटर मार्गावर सुमारे 70 टक्के प्रवासी संख्येत वाढ होत आहे”.

”काळेवाडी फाटा ते देहूआळंदी बीआरटीच्या नवीन मार्गावर ई-बस धावणार आहेत. या मार्गामुळे शहराचा दक्षिण उत्तर भाग जोडला जाणार आहे. चिखली ते हिंजवडी, काळेवाडी फाटा अशी बस धावणार आहे. रहिवाशी आणि औद्योगिक भाग जोडला जाणार असल्याने कामगारांना जलगतीने प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पीएमपीएलने प्रवाशांना ‘आयटीएमएस’ची सुविधा द्यावी. बस फे-या वाढविणे आवश्यक आहे” असेही भोजने यांनी सांगितले.

काळेवाडी फाटा ते देहूआळंदी बीआरटी मार्ग दृष्टीक्षेपात
लांबी 10.25 किलोमीटर
रुंदी 45 मीटर
पदपथ 1.8 मीटर
सायकल ट्रॅक 25 मीटर
संत मदर तेरेसा उड्डाण पुलाची लांबी 1.6

कामाचे टप्पे आणि खर्च

काळेवाडी फाटा ते चिंचवड पुल 38 कोटी
चिंचवड पुल ते पवना नदी 21 कोटी 13 लाख
एम्पायर इस्टेट उड्डाणपूल 121 कोटी 85 लाख
पवना नदी ते केएसबी चौक 48 कोटी 84 लाख
केएसीबी चौक ते देहू आळदी रस्ता 50 कोटी 15 लाख

‘या’ मार्गावर सुरु आहेत बस

सांगवी ते किवळे 14.5 किलोमीटर (5 सप्टेंबर 2015 पासून सुरु)
नाशिक फाटा ते वाकड रस्ता 8 किलोमीटर ( 28 नोव्हेंबर 2015 पासून सुरु)
निगडी ते दापोडी 12.5 किलोमीटर (24 ऑगस्ट 2018 पासून सुरु)

प्रस्तावित मार्ग

बोपखेल ते आळंदी 9 किलोमीटर
भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे 5.2 किलोमीटर हे दोन बीआरटी मार्ग उभारण्याचे प्रस्तावित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.