Talegaon Dabhade : आंबी येथील डी वाय पाटील कॉलेजच्या 40 प्राध्यापकांच्या नोकरीवर गदा

कामावर पुन्हा रुजू करून घेण्याची माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मागणी

एमपीसी न्यूज- आंबी येथील डॉ. डी वाय पाटील कॉलेजमधून अचानकपणे 30 ते 40 प्राध्यापकांना राजीनामा देण्याकरिता सांगण्यात आले असून कुठलीही पूर्वसूचना न देता कॉलेजला येऊ नका असे त्यांना सांगण्यात आलेले आहे. अशी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी माहिती दिली आहे.  या प्राध्यापकांना पुन्हा सेवेत रुजू करून न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिलेल्या निवेदनात प्रदीप नाईक यांनी म्हटले आहे की, आंबी येथील डॉ. डी वाय पाटील कॉलेजमधून अचानकपणे 30 ते 40 प्राध्यापकांना कोणतेही योग्य कारण न देता राजीनामा देण्याकरिता सांगण्यात आले आहे. त्यामध्ये नव्याने रुजू करून घेतलेल्या प्राध्यापकांचा देखील समावेश आहे. गेल्या सात वर्षापासून डी वाय पाटील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून असलेल्या ज्योती जगन्नाथ जाधव यांना देखील 25 सप्टेंबरपासून कॉलेजला येऊ नये असे कॉलेजच्या प्राचार्याकडून 23 ऑगस्ट 2019 रोजी सांगण्यात आले. प्राचार्यांच्या मर्जीतील प्राध्यापकांनाच या ठिकाणी कार्यरत ठेवले असल्याचा आरोप देखील प्रदीप नाईक यांनी केला आहे.

अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राध्यापकांना नोकरीवरून कमी केल्यामुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. अनेकांचे संसार उघड्यावर येणार आहेत. त्यामुळे या प्राध्यापकांना पुन्हा कामावर रुजू करून न घेतल्यास तसेच या प्राध्यापकांच्या समवेत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा प्रदीप नाईक यांनी दिला आहे. डी वाय पाटील कॉलेजचे संस्थापक तसेच इतर सभासद यांनी या विषयाची सखोल चौकशी करावी व योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.