Pune : शुक्रवारपासून जागतिक दर्जाच्या ‘पुणे मोटार शो 2019’चे आयोजन

चारचाकी, दुचाकीचे विविध ब्रँडस्, प्रात्यक्षिके, ऑटो अॅक्सेसरीज् एकाच छताखाली पाहण्याची संधी

एमपीसी न्यूज- खास वाहनप्रेमींसाठी ‘पुणे मोटार शो 2019’ हे जागतिक दर्जाचे दुचाकी, चारचाकी वाहनांचे प्रदर्शन पुण्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने चारचाकी, दुचाकीचे विविध ब्रँडस्, प्रात्यक्षिके, ऑटो अॅक्सेसरीज् एकाच छताखाली पाहण्याची तसेच त्याविषयी माहिती जाणून घेण्याची संधी पुणेकरांना एकाच छताखाली मिळणार आहे. ‘प्राईम व्हॅल्यू मार्केटिंग सर्व्हिसेस’च्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन शुक्रवार, दि. 20 ते रविवार, दि. 22 सप्टेंबर दरम्यान सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत येरवडा येथील डेक्कन कॉलेज ग्राउंड येथे भरविण्यात येणार आहे. सदर प्रदर्शन हे सशुल्क असून त्यासाठी जागेवर अथवा ऑन लाईन रजिस्ट्रेशन देखील करता येणार आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

या तीन दिवसीय प्रदर्शनात गाड्यांशी संबंधित 50 पेक्षा अधिक स्टॉल्स व ब्रँडस् असणार आहेत. यात विविध मोटारबाईक्स, सायकल, दुचाकी, चारचाकी, व्यवसायिक वाहने, इलेक्ट्रिक वाहने, विंटेज कार्स आणि ऑटो अॅक्सेसरीज यांचा समावेश असणार आहे. यात अगदी नव्या ब्रँडसपासून ते जुन्या, नावाजलेल्या ब्रँडस् पर्यंत सर्व प्रकारची वाहने बघायला मिळणार आहेत. ज्यामध्ये अॅवोन मोटर्स, टोयोटा, केटीएम, जेट ई बाइकर्स, स्कोडा आदि कंपन्यांच्या वाहनांचा देखील समावेश असेल. शिवाय ‘वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन’ (डब्ल्यूआयएए), ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (एआयएआय), ग्लोबल इंडिअन बिझनेस फोरम (जीआयबीएफ) यांचेही सहकार्य प्रदर्शनाला लाभले आहे. त्यामुळे नव्या उत्पादकांना एक मोठे व चांगले व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रदर्शनाच्या आयोजक व ‘प्राईम व्हॅल्यू मार्केटिंग सर्व्हिसेस’च्या संचालिक वीणापाणी जोशी यांनी दिली.

या बरोबरच शुक्रवारी (दि. 20) रोजी ‘वाहनउद्योग क्षेत्र आणि त्याचे भविष्य’ या विषयावरील चर्चासत्राचे देखील आयोजन प्रदर्शनाच्या ठिकाणी करण्यात आले आहे. यात ‘वाहनउद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. तसेच भारतातील वयाने सर्वात लहान मोटोक्रॉस रायडर सार्थक चव्हाण, पुण्यातील एकमेव फॉरम्युला फोर रेस कार चालविणा-या महिला चालक डायना पुंडोले, अभिनेत्री प्रियांका यादव आणि चित्रपट निर्माते मेघराजराजे भोसले हे देखील प्रदर्शनाला भेट देतील.

पुण्यातील 60 टक्के नागरिक हे पस्तीशीतील आहेत. ज्यांना वाहन क्षेत्राविषयी आवड आणि त्याबरोबर वैविध्यपूर्ण दुचाकी, चारचाकी गाड्यांविषयी आकर्षण देखील आहे. त्यांच्यासाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे. पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील वाहन उद्योग क्षेत्राचे केंद्रस्थान बनले आहे. या क्षेत्रात सतत नवनवीन तंत्रज्ञान येत असते. तरीही जुन्या ब्रँड्सची ओढ कमी झालेली दिसत नाही. अशा विविध अंगांनी व्यापलेल्या या क्षेत्राला एकाच छताखाली अनुभवण्याची ही संधी असल्याचे यावेळी वीणापाणी जोशी यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.