Pune : लतादीदी यांनी 90 अभिनेत्रींसाठी गायलेली निवडक 90 गीते होणार सादर

एमपीसी न्यूज- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांपैकी निवडक 90 अभिनेत्रीसाठी गायलेली 90 सदाबहार “लता गीते ” सादर करून पुण्यात लता मंगेशकर यांचा नव्वदावा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तेजस थिएटर्स निर्मित, आरती दीक्षित प्रस्तुत ‘आवाज एक, चेहरे अनेक’ हा कार्यक्रम 27 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता, लतादीदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे.

लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस आहे. कार्यक्रमानंतर रात्री बारा वाजता २८ सप्टेबर सुरु होताना केक कापून पुणेकर रसिक वाढदिवस साजरा करणार आहेत. लता मंगेशकर यांनी भारतीय सिनेसृष्टीतील शेकडो अभिनेत्रींसाठी सुरेल आवाज दिला. त्यातील नर्गिस, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, शर्मिला टागोर, हेमामालिनी ते ऐश्वर्या राय अशा अनेक अभिनेत्रीसाठी लता मंगेशकर यांनी गायन केले. त्यातील निवडक ९० अभिनेत्रींवर चित्रित झालेली 90 गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत.

एकूण सहा गायक, आठ वादक या कार्यक्रमात सहभागी होणार असून या गीतांचे गायन सुरु असताना पडद्यावर त्या गीतांवर चित्रित झालेली गीतांची दृश्येही या कार्यक्रमात दाखविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई आणि विनिता गुंदेचा करणार आहेत. दूरदर्शनचे माजी निर्माते अरुण काकतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.