Pune : पोलिसांसाठी राखीव मतदार संघ द्या; पोलीस मित्र संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज- राज्यात शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी शिक्षक मतदारसंघ आहे, पदवीधर मतदारसंघ आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठविण्यासाठी पोलिसांसाठी राखीव मतदारसंघ देण्याची मागणी पोलीस मित्र संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखीव मतदारसंघाच्या मागणीसंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला आहे.

राजेंद्र कपोते म्हणाले, “पोलीस कर्मचारी यांना सोडून सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलने, मोर्चे, उपोषण आदी मार्गाचा वापर करता येतो. परंतु, राज्याची संपूर्ण सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना हे अधिकार दिलेले नाहीत. १४ ते १६ तास ड्युटी करुन पोलीस कर्मचारी, अधिकारी आपले कर्तव्य निभावत असतात. त्यांच्या अनेक समस्या, प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही”

कपोते पुढे म्हणाले की, पोलिसाना व्यवस्थित निवारा नाही. पोलीस वसाहतीची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यांचे पगार तुटपुंजे आहेत. त्यांच्या ड्युटीचे तास अवास्तव आहेत. त्यांना कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत. मुलाबाळांच्या शिक्षणाच्या समस्या आहेत. पोलिसांना संघटना करायची परवानगी नाही, त्यांना तक्रारही करता येत नाही. तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न पडतो.

अशावेळी शिक्षकासाठी ज्याप्रमाणे राखीव शिक्षक मतदारसंघ आहे, तसाच पोलिसांसाठी राखीव मतदारसंघ दिला पाहिजे, अशी पोलीस मित्र संघटनेची मागणी आहे. “शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर पोलीसासाठी स्वतंत्र मतदार संघ निर्माण केल्यास त्यांना स्वतःचा हक्काचा आमदार मिळेल. पोलिसांना आपल्या मागण्या शासनाकडे तसेच विधानसभेत मांडण्यासाठी हक्काचा प्रतिनिधी मिळेल”. यातील कायदेशीर बाबी पडताळून एक समिती नेमून यावर तातडीने मार्ग काढावा असेही राजेंद्र कपोते यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.