Pune : सुशीलकुमार शिंदे यांनी ‘त्या’ वक्तव्या प्रकरणी माफी मागावी : संबीत पात्रा

एमपीसी न्यूज – तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 2013 मध्ये  जयपूरमध्ये ‘भगवा दहशतवाद’ अशी टिप्पणी केली होती. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या. शिंदे यांचा तोच धागा पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी विदेशात पकडला. आपण चार तासांत सोलापुरात पोहोचणार आहे, त्यापूर्वी शिंदे यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबीत पात्रा यांनी केली आहे.

भाजप शहर कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार गिरीश बापट, संजय काकडे यावेळी उपस्थित होते.

संबीत पात्रा म्हणाले, “जम्मू – काश्मीर मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंदीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम हटविल्याने पुण्याचा धर्तीवरून त्यांचे अभिनंदन करतो. हे कलम हटविण्यात आल्याने अलगाववाद, आतंकवाद आणि भ्रष्टाचार कमी होणार आहे. तसेच, तीन परीवारांचीची राजनीती समाप्त होणार आहे. 2004 ते 2019 या कालावधीत 2 लाख 77 हजार कोटी जम्मू – काश्मीरचा विकासासाठी देण्यात आले. त्यात मोदींजींनी 1 लाख 85 हजार कोटी रुपयांचे आणखी वाढीव पॅकेज दिले, पण या भागाचा विकास काही झाला नाही. काँग्रेसला 370 हटवायचे नव्हते. त्याला शरद पवार यांनी का साथ दिली ? असा सवालही पात्रा यांनी उपस्थित केला. याच कलमावरून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मतभेद झाले. त्यामुळेच अजित पवार यांनी राजीनामा दिला, अशी टीकाही त्यांनी केली.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेक स्थानिक समस्या असताना 370 वरच का जोर देण्यात येत आहे, अशी विचारणा केली असता, मला त्यासाठीच पाठविण्यात आले आहे. स्थानिक समस्यांवर आमचे नेते मंडळी बोलणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

हे बघा, आम्ही दोघांनी एकमेकांना धरले !

पत्रकार परिषदेनंतर छायाचित्रकारांना पोझ देताना एका पत्रकाराने खासदार संजय काकडे यांना धरून ठेवण्याची सूचना गिरीश बापट यांना करताच हे बघा, आम्ही दोघांनी एकमेकांना पकडून ठेवले, अशी कोपरखळी बापट यांनी मारली. त्यामुळे एकच हशा पिकला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.