Mumbai : शिखर बँक प्रकरणात विनाकारण शरद पवार यांचे नाव घेतल्याने मी आमदारकीचा राजीनामा दिला – अजित पवार

एमपीसी न्यूज – शिखर बँक प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सहभाग नसताना त्यांचे नाव यात टाकण्यात आले. यामुळे मी अस्वस्थ झालो. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये माझे नाव नसते तर ही केस पुढे आलीच नसती. केवळ माझे नाव असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बदनामी सहन करावी लागते. याचा विचार करून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि फोन बंद करून ठेवला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज मुंबईत वाय. बी. सेंटरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये केले.

आज सकाळी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पवार कुटुंबीयांची बैठक संपली. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीत काय घडले?, कोणता निर्णय घेण्यात आला? याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. त्यामुळे दुपारी अजित पवार मुंबईतील वाय. बी. सेंटरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आपली कोणती भूमिका स्पष्ट करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील यांचीही उपस्थिती होती.

यावेळी अजित पवार म्हणाले, मी हरिभाऊ बागडेंना तीन दिवसांपूर्वी फोन केला होता. त्यावेळी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही मुंबईत कधी असणार आहात? आम्ही सगळे शिखर बँकेत संचालक म्हणून काम करत होतो. आता निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्यामुळे ज्यांना वेदना झाल्या त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो.

शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांचा काहीही संबंध नाही. तरीही त्यांचे नाव यामध्ये घेण्यात आले. ईडीने अजित पवार संचालक म्हणून कार्यरत होते म्हणून शरद पवार यांचे नाव दिले आहे. माझं आणि शरद पवार यांचं नातं असल्याने ईडीने त्यांचे नाव या प्रकरणात घेतले आहे. या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो म्हणूनच राजीनामा दिला.

शिखर बँक प्रकरणात सुमारे 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. ज्या बँकेच्या ठेवीच 12 हजार कोटीपर्यंत आहेत त्यात एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा होईलच कसा? असाही प्रश्नहि अजित पवार यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.