Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये एक तरी ब्राह्मण उमेदवार द्यावा, अ.भा. ब्राह्मण महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील एका मतदारसंघाची उमेदवारी ब्राह्मण समाजातील एका सक्षम नेत्याला देण्यात यावी. कोणत्याही राजकीय पक्षाने समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. एकाही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. शहरातील चिंचवड आणि भोसरी हे दोन विधानसभा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी आहेत. शहरात ब्राह्मण समाजाची लोकसंख्या मोठी आहे. ब्राह्मण समाज एकोप्याने रहात आहे.

विविध सामाजिक कार्यात समाजातील लोक सातत्याने सहभागी असतात. शहरासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. तरी सुद्धा अनेक वर्षांपासून ब्राह्मण समाजातील व्यक्तीला शहरातून विधीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली नाही. आजपर्यंत कोणत्याही पक्षाने समाजाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिलेली नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीकरिता चिंचवड किंवा भोसरी या दोन्ही मतदारसंघापैकी एका मतदारसंघाची उमेदवारी ब्राह्मण समाजातील एका सक्षम नेत्याला द्यावी. कोणत्याही पक्षाने समाजाला उमेदवारी द्यावी. समाजाचा उमेदवार आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, असेही कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.