Pune : पैशासाठी आजीचा खून करणाऱ्या नातवाला अटक

एमपीसी न्यूज- कल्याणीनगर परिसरात झालेल्या ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा उलगडा लागला असून व्यसनासाठी पैसे हवे असल्याने बावीस वर्षीय नातवानेच आजीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे येरवडा पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे. सदर आरोपीला हिमाचल पोलिसांनी तेथे एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. पुणे पोलीस त्याला हिमाचल पोलिसांच्या ताब्यातून घेणार आहेत.

ओशम संजय गौतम (वय 22, रा. हिमाचल प्रदेश) असे खून करणाऱ्या नातवाचे नाव आहे. चांदणी चौहान (वय 67, रा. सनशाइन सोसायटी, कल्याणीनगर) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. ज्येष्ठ महिला राहत असलेल्या सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. ज्या ठिकाणी हा खून झाला तेथील सीसीटीव्ही व येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद असलेल्या रजिस्टरवरून पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध लावला.

आरोपी ओशम हा ज्येष्ठ महिलेचा नातू आहे. त्याला अनेक प्रकारची व्यसने होती. आईच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या पैशांवरून त्यांच्यात वाद देखील होते. ओशम हिमाचल प्रदेशात मित्रासोबत राहत असताना त्याने मित्राची दुचाकी व एटीएम कार्डची चोरी केली. त्यानंतर त्याने एटीएममधून दीड लाख रुपये काढले. यानंतर काही दिवसांनी तो पुण्यात आजीकडे आला होता. येथे त्याची आजीबरोबर पैशांवरून भांडणे झाली. त्यामुळे रागातून ओशमने उशीने आजीचे तोंड दाबून खून केला. त्यानंतर घरातील पैसे व दागिने चोरी करून तो परत हिमाचलला गेला. त्या ठिकाणी एका चोरीच्या गुन्ह्यात तेथील पोलिसांनी त्याला अटक केली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपीला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.