Pimpri : पिंपरी-चिंचवडला प्रथमच आढळलेल्या प्रवासी पक्ष्यांच्या दोन प्रजातींची जागतिक विज्ञान शोधपत्रिकेत नोंद

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड परिसरात प्रथमच आढळलेल्या दोन प्रवासी पक्ष्यांच्या दोन प्रजातींची नोंद शोधनिबंधाद्वारे जागतिक दर्जाच्या विज्ञान शोधपत्रिकेत नुकतीच प्रकाशित झाली आहे. ‘पिवळी लिटकुरी (ग्रे हॅडेड कॅनेरी फ्लायकॅचर)’ आणि ‘करड्या डोक्याची मैना (चेस्टनट-टेल्ड स्टार्लिंग)’ या हिवाळी प्रवासी पक्ष्यांच्या दोन प्रजातींची चिंचवड येथे प्रथमच नोंद झाली आहे.

अलाईव्हचे पक्षी अभ्यासक उमेश वाघेला, प्रशांत पिंपळनेरकर, प्रदीप खैरे आणि निनाद रावते यांना ‘पिवळी लिटकुरी’ आणि ‘करड्या डोक्याची मैना’ हे हिवाळी पाहुणे पक्षी चिचंवड येथे पक्षी निरीक्षण करताना आढळून आले होते. याविषयीचे दोन शोधनिबंध ‘इला फाउंडेशन’ आणि ‘वन विभाग महाराष्ट्र’ द्वारा प्रकाशित ‘इला जर्नल ऑफ फॉरेस्ट्री एन्ड वाईल्डलाईफ’ या जागतिक दर्जाच्या ई-शोधपत्रिकेत नुकतेच प्रकाशित झाले आहेत.

‘पिवळी लिटकुरी’ हा फक्त 9 सेंटीमीटरचा इवलाशा पक्षी थेट हिमालयातून स्थलांतर करून उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात हिवाळ्यात हंगामी वास्तव्यास येतो. महाराष्ट्रात फक्त पश्चिम घाटात काही मोजक्या ठिकाणीच हा पक्षी क्वचित दिसल्याची नोंद आहे. दाट झाडीत राहणारा हा देखणा पक्षी कीटकभक्ष्यी असून सुमधूर, कर्णप्रिय शीळ घालतो.

करड्या डोक्याची मैना हा इशान्य भारतातील रहिवासी पक्षी असून मध्य आणि पश्चिम भारतात हिवाळी पाहुणा म्हणून येतो. महाराष्ट्रात हिवाळ्यामधे सामान्यपणे कोकणात आणि इतर ठिकाणी क्वचित पाच ते सहाच्याच संख्येत आढळून आल्याची नोंद आहे. मात्र पिंपरी-चिंचवड परिसरात हा पक्षी चिंचवड येथे एकाच ठिकाणी शंभराहून अधिकच्या संख्येने आढळून आला. 20 सेंटीमीटरचा हा पक्षी नेहमी भोरडी मैना आणि ब्राह्मणी मैना यांच्या सोबत दिसतो. खुली झाडे आणि शेती परिसरात आढळणारा आणि फळे, मकरंद, किटक खाणारा मिश्राहारी पक्षी आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात या आधी हे दोन्ही पक्षी आढळल्याची नोंद नाही. विशेष म्हणजे करड्या डोक्याची मैना या पक्ष्याची एवढ्या मोठ्या थव्यात पुणे जिल्ह्यातही यापूर्वी दिसल्याची नोंद नाही. ‘अलाईव्ह’ संस्था जनजागृती, शिक्षण, संशोधन, दस्तावेजीकरण आणि प्रत्यक्ष संवर्धन या उपक्रमांद्वारे निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत आहे. संस्थे द्वारा 2007 सालापासून पिंपरी-चिचंवड परिसरातील पक्ष्यांच्या नोंदी करण्यात येत आहेत. आता त्या यादीत ‘पिवळी लिटकुरी’ आणि ‘करडया डोक्याची मैना’ यांची देखील भर पडली आहे.

तसेच या शोधनिबंधांमुळे संस्थेच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याची भावना ‘अलाईव्ह’चे अध्यक्ष उमेश वाघेला यांनी व्यक्त केली. अभ्यासू व्यक्तींना या विषयीची अधिक माहिती http://www.elafoundation.org या वेबसाईटवरुन व्होल्युम 8 (अंक 1-2) पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.